पावसाळ्यात एक्स्प्रेस आणि मेल गाड्यांपेक्षा लोकल गाड्यांना अधिक प्राधान्य द्यावे लागते. पावसात मेल-एक्स्प्रेस गाड्या विलंबाने धावतात. लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावताना प्रवाशांची तारांबळ उडते. मेल-एक्स्प्रेसची वाट पाहून कंटाळलेल्या प्रवाशांच्या मनोरंजनासाठी मध्य रेल्वेने आभासी जगताचा मोफत प्रवास करण्याची संधी प्रवाशांना दिली आहे. काय आहे ही अनोकी संकल्पना याविषयी जाणून घेऊया…
आभासी जगताची सफर घडवणारी प्रतिमा
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील मेल-एक्स्प्रेस फलाटावर ‘ऑगमेंटड रिअॅलिटी मॅजिक मिरर’ अर्थात आभासी जगताची सफर घडवणारी प्रतिमा उभारलेली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रथमच असा उपक्रम यशस्वीपणे राबवला आहे. आभासी प्रतिमेच्या स्क्रिनसमोर उभ्या असलेल्या व्यक्तीभोवती एक आभासी जग तयार करण्यासाठी ऑगमेंटड रिअॅलिटीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी विशेषत: बच्चेकंपनीसह ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. प्रत्येक महिन्याच्या प्रसंगानुरूप यात बदल करण्यात येणार आहे. उदाहरणार्थ पावसाळ्यात, हिमालयातील बर्फवृष्टी, समुद्र किनारी, डॉल्फिन यांची आभासी चित्र उभारले जातील.
( हेही वाचा : रेल्वे प्रवाशांना दिलासा! १५ डबा लोकलच्या २७ फेऱ्या वाढवण्याचे नियोजन )
प्रवासी मनोरंजनासह मेल-एक्स्प्रेसच्या गाड्यांची माहिती सुद्धा या स्क्रिनद्वारे देण्यात येणार आहे. प्रवाशांना या आभासी जगताचा प्रवास करता यावा यासाठी पाच वर्षांचा करार करण्यात आला आहे. या करारातून मध्य रेल्वेला ५० लाख रुपयांचा महसूल प्राप्त होणार आहे.