आता घरबसल्या करा राणीबागेतील प्रवेश निश्चित

132

मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील राणीबागेतील प्राणिसंग्रहालयातील पर्यटकांची संख्या वाढत असल्याने अनेकदा पर्यटकांना क्षमतेअभावी माघारी फिरावे लागते. परंतु राणीबागेत येऊनच तिकीट काढून प्रवेश घेण्याऐवजी आता पर्यटकांना आता ऑनलाईन नोंदणी करूनच प्राणिसंग्रहालयात प्रवेश घेता येणार आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने ऑनलाईन नोंदणीची प्रणाली विकसित केली जात असून लवकरच ऑनलाईनद्वारे पर्यटकांना राणीबागेतील आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे.

(हेही वाचा – आधीच कमी त्यात जुंपले बंदोबस्ताच्या कामी, दसरा मेळाव्यांसाठी २० हजार पोलीस)

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय हे देशातील सर्वांत जुन्या प्राणिसंग्रहालयापैंकी एक आहे. या प्राणिसंग्रहालयात १३ जातींचे ८४ सस्तन प्राणी, १६ जातींचे १९२ पक्षी, ०७ जातींचे ३२ सरपटणारे तसेच जलचर प्राणी असे मिळून एकूण ३०१ प्राणी व पक्षी आहेत. तसेच अनेक दुर्मिळ झाडे व वृक्ष आहेत. या प्राणिसंग्रहाचे नुतनीकरण केल्यानंतर या पेंग्विन पक्ष्यांसह इतर प्राणी आणण्यात आले तेव्हापासून पर्यटकांची संख्या वाढत असल्याचे दिसून आली आहे.

या प्राणिसंग्रहालयात सरासरी वर्षाला दहा लाख पर्यटक येत असतात. परंतु कोविड काळातही पर्यटकांची संख्या घटली असली तरी कोविड निर्बंध हटवल्यानंतर पुन्हा एकदा पर्यटकांची संख्या वाढत आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये ८१ हजार पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली होती. दिवसाला सरासरी दहा ते पंधरा हजार पर्यटक येत असल्याने क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक आल्यास तिकीट विक्री बंद करण्यात येते. परिणामी अनेक पर्यटकांना तिकीटअभावी राणीबागेत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे आपल्या मुलाबाळांना आलेल्या मातापित्यांना निराश होऊन घरी परतावे लागते. त्यामुळे पर्यटकांना घरुनच राणीबागेतील प्रवेश निश्चित करता यावा यासाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत उपायुक्त किशोरी गांधी यांच्याशी संपर्क साधला असला त्यांना राणीबागेत येणाऱ्या पर्यटकांची निराशा होऊ नये म्हणून ऑनलाईन प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे. ही ऑनलाईन प्रणाली विकसित केली जात असून त्यानंतर राणीबागेत येणाऱ्या पर्यटकांना घरबसल्या नोंदणी करून प्रवेश निश्चित करून घेता येईल. त्यामुळे लवकरच ऑनलाईन नोंदणीची प्रणाली उपलब्ध करून दिली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.