मेट्रो ३च्या प्रस्तावित कारशेडच्या जागेवरील वादावरुन २०१४ सालापासून सुरु झालेले आरेतील रणकंदन आता पुन्हा पेटणार आहे. आरेतील कारशेडची जागा अद्यापही स्थलांतरीत होत नसल्याने आरेतून कारशेडची जागा हलवण्यासाठी व आता पुन्हा लढण्यासाठी पर्यावरणप्रेमी सज्ज झाले आहे. येत्या रविवारी आरेतील पिकनिक पॉइंट येथे सकाळी दहा वाजता पर्यावरणप्रेमी पुन्हा मोर्चा काढणार आहेत.
( हेही वाचा : फ्रान्सने रशियाला ‘ही’ दिली भयंकर धमकी, ज्यामुळे जगाची उडाली झोप… )
आरेत मेट्रो ३चे कारशेड उभारले जाणार असल्याचा निर्णय पूर्व भाजप-शिवसेना युती सरकारचा झाला होता. या निर्णयाला सुरुवातीपासूनच पर्यावरणप्रेमींनी विरोध केला. शिवसेनेनेही कारशेडच्या प्रस्तावित जागेला कडाडून विरोध केला. मात्र आता भाजप-शिवसेना यांची ताटातूट झाल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसपक्षाला हाताशी धरून २०१९ साली राज्यात सत्ता स्थापन केली. या दोन वर्षांच्या काळात राज्य सरकार कांजूरमार्ग येथील जागेत मेट्रो ३ कारशेड उभारेल, अशी आश्वासने सरकारच्यावतीने दिली गेली. परंतु कारशेडबाबत कांजूरमार्ग येथे कोणत्याही हालचाली दिसून आलेल्या नाहीत. शिवाय आरेतील मेट्रो-कारशेडच्या जागेत चोरीछुपे थोडे काम सुरु असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला.
आरेतील मेट्रो ३ च्या कारशेडच्या जागेवर काय काम सुरु आहे
आरेतील मेट्रो ३च्या कारशेडच्या जागेवर मोठे बॅरिकेट्स टाकले जात आहे. याविषयीच्या बांधकामाबाबत पर्यावरणप्रेमींनी जाब विचारताच त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. याबाबतचा व्हिडिओ काढल्यानंतर काम बंद करण्यात आल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला. मेट्रो ३ च्या कारशेडजागेत मोठमोठे खांब उभारले जात आहेत. आतमध्ये मोठे खड्डे तयार करुन त्यात पाणी भरले गेले आहे. या हालचाली पाहता राज्य सरकारने आरेतील मेट्रो ३ च्या कारशेड उभारणीबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
तर पोलिसांकडून कारवाईचा बडगा
रविवारी सकाळपासून सुरु होणा-या आंदोलनाबाबत माहिती देण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी आरे पोलीस ठाण्याला भेट दिली. मात्र कोरोनाकाळात मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होता येणार नाही, आंदोलन झाल्यास जमावबंदी लागू केली जाईल, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आल्याची माहिती पर्यावरणप्रेमींनी दिली.
Join Our WhatsApp Community