महाराष्ट्रात 6 ठिकाणी ESIC द्वारे 100 खाटांची रुग्णालये

श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) रविवारी झालेल्या 188 व्या बैठकीत देशभरातील वैद्यकीय सेवा आणि सेवा वितरण यंत्रणा विस्तारण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. 2022 च्या अखेरपर्यंत संपूर्ण देशात कर्मचारी राज्य विमा (ESIC) योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या, ईएसआय योजना 443 जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे आणि 153 जिल्ह्यांमध्ये अंशत: लागू आहे, तर 148 जिल्हे ईएसआय योजनेत समाविष्ट नाहीत.

(हेही वाचा – IRCTC : जगन्नाथ यात्रेला जायचंय? भारतीय रेल्वे देतंय कमी बजेटमध्ये फिरण्याची संधी)

2022 च्या अखेरपर्यंत ही योजना अंशत: लागू असलेले आणि अंमलबजावणी न झालेले देशभरातील जिल्हे या योजनेत पूर्णपणे समाविष्ट केले जातील. आयुष्मान भारत पीएमजेएवायच्या आयएमपी आणि संलग्न रुग्णालयांच्या माध्यमातून नवीन दवाखानासह शाखा कार्यालय (डीसीओबी)स्थापन करून वैद्यकीय सेवा प्रदान केल्या जातील.

महाराष्ट्रात 48 रुग्णालये होणार सुरू

कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) देशभरात 23 नवीन 100 खाटांची रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील पालघर, सातारा, पेण, जळगाव, चाकण आणि पनवेल येथे ही सहा रुग्णालये ईएसआयसीद्वारे उभारली जातील.या रुग्णालयांशिवाय 62 ठिकाणी 5 डॉक्टर असलेले दवाखानेही सुरू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात 48 रुग्णालये, दिल्लीत 12 दवाखाने आणि हरियाणामध्ये 2 दवाखाने सुरू होणार आहेत. ही रुग्णालये आणि दवाखाने विमाधारक कामगारांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना, त्यांच्या निवासस्थानाच्या जवळपासच्या परिसरात दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवतील आणि विमाधारकांना देण्यात येणाऱ्या उपायोजनांमध्ये देखील वाढ करतील.

कॅशलेस वैद्यकीय सेवा मिळण्यास होणार मदत 

दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी, ईएसआयसी नवीन रुग्णालये स्थापन करत आहे आणि विद्यमान रूग्णालयांमध्ये सुधारणा करून पायाभूत सुविधांमध्ये वाढ करत आहे. नवीन रुग्णालये उभारण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन, ज्या भागात ईएसआय योजना अंशत: अंमलात आणली आहे किंवा अंमलात आणली जाणार आहे किंवा जेथे ईएसआयसीच्या विद्यमान आरोग्य सेवा सुविधा मर्यादित आहेत अशा सर्व भागातील विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना, आयुष्मान भारत पीएमजेएवाय संलग्नीकृत रुग्णालयांद्वारे रोकड विरहित (कॅशलेस )वैद्यकीय सेवांचा लाभ देण्याचा निर्णय ईएसआयसीने आपल्या बैठकीत घेतला आहे.या संलग्न व्यवस्थेद्वारे 157 जिल्ह्यांतील ईएसआय योजनेचे लाभार्थी आधीपासूनच कॅशलेस वैद्यकीय सेवेचा लाभ घेत आहेत. या निर्णयामुळे लाभार्थ्यांना उर्वरित जिल्ह्यांमध्ये कॅशलेस वैद्यकीय सेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

ईएसआयसी द्वारे गेल्या आठ महिन्यांत विविध पदांसाठी 6400 रिक्त पदांची जाहिरात काढण्यात आली आहे ज्यामध्ये 2000 हून अधिक डॉक्टर/शिक्षकांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली. पुणे येथील सध्या 200 खाटांच्या ईएसआयसी रुग्णालयाचे 500 खाटांच्या अद्ययावत रुग्णालयात रूपांतर करण्याच्या निर्णयही रविवारच्या बैठकीत घेण्यात आला. या रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणामुळे पुण्यातील 7 लाख कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना फायदा होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here