मागील १० ऑक्टोबर मराठी भाषेतील दुकानांच्या पाट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर मागील आठ दिवसांमध्ये मराठीतून नामफलक नसलेल्या ३०३४ दुकानांना महापालिकेच्या दुकान व आस्थापना विभागाने नोटीस बजावली आहे. मात्र, या आठ दिवसांमध्ये मराठीतील नामफलक लावणे बंधनकारक असूनही या मुदतीत मराठीतून नामफलक न लावणाऱ्या दुकान चालकांवर तसेच मालकांवर महापालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याची माहिती मिळत आहे.
( हेही वाचा : अमेरिकेतून भारतात आला ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट )
दुकानांचे नामफलक मराठीतून करण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपुष्टात आली. त्यानंतर ९ ऑक्टोबरपासून मुंबईतील २४ विभागांमधील दुकाने व आस्थापना विभागाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली. यापूर्वी मुंबई महापालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाच्या निरिक्षकांनी केलेल्या सर्वेमध्ये मुंबईतील एकूण २ लाख दुकानांच्या पाट्यांपैंकी केवळ ४८ टक्के म्हणजे ९७ हजार दुकानांच्या पाट्या या मराठी भाषेत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा सोमवारपासून प्रत्यक्ष दुकानांची पाहणी करण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी संपूर्ण मुंबईतील २ हजार १५८ दुकानांना भेटी देण्यात आल्या. त्यातील १६३६ ठिकाणच्या दुकानांवर मराठी नामफलक आढळून आले, उर्वरीत ५२२ ठिकाणी मराठी नामफलक नसल्याचे आढळून आले होते. तर १८ ऑक्टोबर पर्यंत महापालिकेच्या दुकाने व आस्थापने विभागाने एकूण १३ हजार ९४२ दुकानांना भेटी दिल्या. त्यात १० हजार९०८ दुकानांचे नामफलक मराठी असल्याचे आढळून आले. तर १० ते १८ ऑक्टोबरच्या कालावधीत अधिनियमानुसार एकूण ३०३४ दुकानांचे नामफलक हे मराठीत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे या सर्व दुकानांच्या मालक तसेच चालकांना महापालिकेने नोटीस बजावली. परंतु ज्या दुकानांना मागील सोमवारी व मंगळवारी नोटीस दिली त्या दुकानाचे नामफलक हे मराठीत होणे बंधनकारक असलेले तरी त्या दुकानदारांकडून मराठीत नामफलक लावण्याची कार्यवाही न झाल्याने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई महापालिकेने केल्याचे दिसून आले नाही. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आठ दिवसांचा कालावधी उलटलेल्या दुकानांची पाहणी पुन्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेली नाही.
- १० ते १८ ओक्टोबर च्या कालावधीतील दुकानांच्या भेटी: १३,९४२
- मराठीतून पाट्या असलेल्या दुकानांची संख्या:१०,९०८
- नोटीस बजावलेल्या दुकानांची संख्या: ३०३४