रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी देऊन एक महिना उलटत आला तरी अद्यापही या फेरीवाल्यांवर कारवाई झालेली नाही. दादरसह आजही अनेक रेल्वे स्थानकांना फेरीवाल्यांचा विळखा पडलेला असून हा विळखा महापालिका आणि पोलिस यांच्या वरदहस्ताने अधिकच मजबूत होत अधिकाधिका आवळला जात आहे. त्यामुळे ना फेरीवाल्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भीती,ना पोलिसांची. त्यामुळे रेल्वे स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा सोडवायला पोलिस आयुक्तही कमी पडले का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
( हेही वाचा : आपल्या पाल्याचा प्रवेश अनधिकृत शाळेत तर घेत नाहीत ना! मुंबईत यंदा वाढल्या ५ अनधिकृत शाळा)
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर शाळा, मंडई, हॉस्पिटल आदी ठिकाणच्या १०० मीटर परिसरातही फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. परंतु न्यायालयाच्या निर्देशानुसार, रेल्वे स्थानक, शाळा, कॉलेज, मंडई आणि हॉस्पिटल आदी परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. परंतु ही कारवाई केली जात नाही. एका बाजुला ही कारवाई केली जात नसतानाच मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना करत रेल्वे स्थानकाशेजारील फेरीवाल्यांना हटवण्यास सांगितले. पण आजतागायत रेल्वे परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नसून महापालिका आयुक्तांकडूनही या परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसून आला नाही.
महापालिका आयुक्तांनी अद्यापही कोणत्याही प्रशासकीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांना निर्देश देत ही कारवाई करण्यास भाग पाडले नाही.तसेच अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही अशाप्रकारचे निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे फेरीवाल्यांनी स्थानकापासून १५० मीटर दूर, उलट रेल्वे स्थानकांच्या पायऱ्यांवरच पथारी पसरवून फेरीचा धंदा करून एकप्रकारे पोलिस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आव्हान दिले आहे.
दादरमध्ये केवळ दुपारी आणि संध्याकाळी काही मिनिटांकरता कारवाई
दादर पश्चिम येथील स्थानकाशेजारी परिसरातील फेरीवाले सकाळी ११ ते साडेबारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी साडेपाच ते सव्वा सहा या वेळेत फेरीचा धंदा बंद करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा सन्मान राखतात. जी उत्तर विभागातील अधिकारी हे सहा वाजून १३ मिनिटांची अंबरनाथ गाडी पकडून घरी जात असतात. त्याआधी ते साडेपाच नंतर कार्यालयातून बाहेर पडतात. त्या कालावधीतच फक्त फेरीवाले व्यवसाय करत नसून त्यानंतर मिळेल तिथे पुन्हा पथारी पसरवून फेरीवाले व्यवसाय करत असतात,असे दिसून येते.
Join Our WhatsApp Community