कोस्टल रोडच्या बांधकामातही हाजीअलीकडे तग धरुन आहेत समुद्री प्रवाळ

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सागरी मार्गाच्या बांधकामामुळे हाजीअलीच्या समुद्रातील सागरी प्रवाळ राष्ट्रीय समुद्रीविज्ञान संस्थेने कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात स्थलांतरित  केले होते. समुद्रातील वेगाने वाहणा-या लाटांना समुद्र किना-यावर नियंत्रणात राखण्यात समुद्री प्रवाळ खारफुटींसारखीच महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रवाळ स्थलांतरित केल्याने निराश झालेल्या समुद्री जैवविविधतेवर प्रेम करणा-यांना फारच दुःख झाले होते. आता हाजीअली परिसरात अजूनही समुद्री प्रवाळ दिसून येत असल्याने समुद्रातील जैवविविधता सर्वत्र विखुरल्याचा आनंद निसर्गप्रेमींनी व्यक्त केला.

हाजीअली ते महालक्ष्मीदरम्यानच्या समुद्रात समुद्री प्रवाळ

समुद्री परिसंस्थेत समुद्री प्रवाळांना विशेष महत्त्व दिले जाते. दगडांवर आढळणारे कडक आकाराचे समुद्री प्रवाळ हे दिसायलाही आकर्षक असतात. समुद्री जिवांच्या छायाचित्रणासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रदीप पाताडे यांनी हाजीअली येथे केलेल्या पाहणीत समुद्री प्रवाळ अजूनही या भागांत तग धरुन असल्याचे दिसले. हाजीअली ते महालक्ष्मीदरम्यानच्या समुद्रात समुद्री प्रवाळ असल्याचे पाताडे यांच्या निदर्शनास आले. किना-यापासून अगदी २०० मीटर अंतरावर प्रवाळ सहज दिसत असून, इंग्रजी भाषेतील हार्ड कोरल ही प्रजाती या भागांत दिसत असल्याचेही ते म्हणाले.

समुद्री प्रवाळाचे महत्त्व

भारतीय वन्यजीव संवर्धन कायद्यातील १९७२ अन्वये समुद्री प्रवाळ संरक्षित आहेत. त्यांना पहिल्या वर्गवारीत सुरक्षित करण्यात आले आहेत. शिवाय समुद्री प्रवाळात कित्येक माशांची अन्नसाखळी तयार होत असते. मासे प्रजनन काळात प्रवाळातच प्रामुख्याने आढळतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here