आंध्रप्रदेश सरकार राज्यातील प्रत्येक गावात मंदिर उभारणार आहे. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी हिंदू धर्माच्या संरक्षण आणि प्रचारासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण यांनी दिली.
यासंदर्भात कोट्टू सत्यनारायण यांनी आपल्या लेखी निवेदनात म्हटले की, हिंदू धर्माचे मोठ्या प्रमाणावर संरक्षण आणि प्रचार करण्यासाठी दुर्बल घटकांच्या भागात हिंदू मंदिरांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या श्री वाणी ट्रस्टने मंदिरांच्या बांधकामासाठी प्रत्येकी १० लाख रुपये दिले आहेत. तसेच १,३३० मंदिरांचे बांधकाम सुरू झाल्यानंतर, यादीत आणखी १,४६५ मंदिरांची योजना आखली आहे. काही आमदारांच्या विनंतीवरून आणखी २०० मंदिरे बांधली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री कोट्टू सत्यनारायण म्हणाले की, उर्वरित मंदिरे इतर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने बांधली जातील.
उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, एंडोमेंट विभागांतर्गत ९७८ मंदिरांचे बांधकाम वेगाने सुरू आहे, तर प्रत्येक २५ मंदिरांचे काम एका सहाय्यक अभियंत्याकडे सोपविण्यात आले आहे. ते म्हणाले की, काही मंदिरांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि मंदिरांमध्ये धार्मिक विधी करण्यासाठी वाटप केलेल्या २७० कोटी रुपयांच्या सीजीएफ निधीपैकी २३८ कोटी रुपये आधीच जारी करण्यात आले आहेत. तसेच, या आर्थिक वर्षात ५००० रुपये प्रति मंदिर दराने धार्मिक विधी (धूप-दीप नैवेद्यम) निधीसाठी राखून ठेवलेल्या २८ कोटींपैकी १५ कोटी रुपये संपले आहेत. २०१९ पर्यंत धूप-दीप योजनेअंतर्गत केवळ १५६१ मंदिरांची नोंदणी होती, ती आता ५ हजार झाल्याचे कोट्टू सत्यनारायण यांनी सांगितले.
(हेही वाचा – मिशन चांद्रयान ३! इस्रोकडून मुख्य इंजिनची यशस्वी चाचणी)
याचबरोबर, कोट्टू सत्यनारायण म्हणाले. तसेच, एंडोमेंट्स विभाग प्रत्येक मंदिरासाठी १० लाख रुपये देऊन ३ हजार मंदिरे विकसित आणि नूतनीकरण करण्याची योजना आखत आहे. यापूर्वीच जगन मोहन सरकारने २६ जिल्ह्यांमध्ये १४०० मंदिरे बांधण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी १०३० बांधकामे सरकार स्वत: तर ३३० समरसथ सेवा फाऊंडेशन बांधत आहेत. विशेष म्हणजे, हे फाउंडेशन आरएसएसशी संलग्न एनजीओ आहे. प्रत्येक मंदिरासाठी ८-८ लाख आणि मूर्तीसाठी २-२ लाख रुपयांची तरतूद केल्याचे कोट्टू सत्यनारायण यांनी स्पष्ट केले.