भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या बँक खात्यावर सायबर गुन्हेगाराने ऑनलाईन दरोडा टाकून बँक खात्यातून एक लाख १४ हजार रुपयांची रक्कम उडवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. वांद्रे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करीत सायबर पोलिसांच्या मदतीने कांबळी यांच्या खात्यावरून गेलेली रक्कम पुन्हा कांबळी यांच्या खात्यावर वळती करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मोबाईल फोनचा रिमोट एक्सेस घेतला
भारतीय माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना ३ डिसेंबर रोजी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता, फोन करणाऱ्या व्यतीने कोटक महिंद्रा बँकेतून बोलत असल्याचे सांगत तुमचे केवायसी अपडेट झालेले नाही, पुढचे व्यवहार तुम्हाला करता येणार नाही, असे सांगून घाबरवले. कांबळी यांना ‘एनी डेस्क’ अँप डाउनलोड करायला सांगून त्याचा मोबाईल फोनचा रिमोट एक्सेस फोन करणाऱ्याने स्वतःजवळ घेतला. कांबळी यांचे ऑनलाईन खाते हाताळत खात्यातून सुमारे १ लाख १४ हजार रुपये दुसऱ्या खात्यावर वळते करण्यात आले. हे प्रकरण कांबळी यांच्या लक्षात येताच त्यांनी बँक अधिकारी आणि त्याच्या सीएसोबत चर्चा केली असता, बँककडून असे कुठले कॅाल येत नाही, असे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कांबळी याने बँकेशी संपर्क साधून व्यवहार थांबवण्यास सांगितले आणि वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
(हेही वाचा अबब…न्यायाधीशांचा तुटवडा, प्रलंबित खटले संपवायला ३ दशके लागणार)
कांबळी यांच्या खात्यावर रकम वळती
वांद्रे पोलिसांनी सायबर सेल पोलिसांच्या मदतीने ताबडतोब कांबळी यांची गेलेली रक्कम दुसऱ्या खात्यात जाऊ न देता पुन्हा कांबळी यांच्या खात्यावर वळती करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. सायबर गुन्हेगारांकडून केवायसीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरु आहे, नागरिकांनी ओटीपी आणि खाते संबधी अथवा खाजगी माहिती अनोळखी व्यक्तीला न देता बँकेशी प्रत्यक्षात संपर्क साधून केवायसी अपडेट करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.