देशाची अत्यंत महत्वाची तपास यंत्रणा म्हणून ओळखली जाणारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण अर्थात सीबीआयच्या प्रमुखपदी सुबोध कुमार जयस्वाल यांची निवड करण्यात आली आहे. या पदावर प्रभारी म्हणून प्रवीण सिन्हा हे होते. आता या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी, २४ मे रोजी उच्च स्तरीय समितीची बैठक पार पडली. त्यानंतर मंगळवारी, २५ मे रोजी सुबोध कुमार यांची निवड करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. जयस्वाल हे १९८५चे बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक होते.
३ फेब्रुवारी २०१९ पासून कायमस्वरूपी नियुक्ती झालीच नाही!
या उच्च स्तरीय समितीच्या अध्यक्षपदी स्वतः पंतपधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन.व्ही. रामण्णा आणि लोकसभेचे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी हे आहेत. ३ फेब्रुवारी रोजी ऋषी कुमार शुक्ला यांचा सीबीआयच्या प्रमुख पदावरचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यांची ४ फेब्रुवारी २०१९ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्या जागी प्रवीण सिन्हा यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
कोण आहेत सुबोध कुमार जयस्वाल?
मुंबईचे पोलिस आयुक्त आणि महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक पद भूषवल्यानंतर जयस्वाल हे केंद्राच्या सेवेत रुजू झाले होते. सुबोध जयस्वाल यांनी ९ वर्षे देशाच्या गुप्तचर विभागाचे काम बघितले आहे. सीबीआयच्या प्रमुख पदाचे सुबोध जयस्वाल हे तिसरे दावेदार होते. अखेर सुबोध जयस्वाल यांची सीबीआयच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले सुबोध जयस्वाल हे दोन वर्षानंतर सेवानिवृत्त होत आहे.
(हेही वाचा : सीबीआयच्या प्रमुखपदासाठी ‘या’ अधिकाऱ्यांमध्ये चुरस!)
हे होते स्पर्धेत!
- राकेश अस्थाना – १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हे सध्या सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक आहेत.
- वाय.सी. मोदी – १९८४ च्या बॅचचे आयपीएसअधिकारी आहेत. सध्या ते भारत – तिबेट सीमा पोलिस दलाचे महासंचालक आहेत.
- एच.सी. अवस्थी – १९८५ च्या बॅचचे हे आयपीएस अधिकारी असून ते सध्या उत्तर पोलिस दलाचे महासंचालक आहेत.