जुनी मुंबई कशी होती? बॉम्बे ते मुंबई असा उत्कंठावर्धक प्रवास आमच्या मुंबईचा…

मुंबई हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. सुमारे १२ दशलक्ष एवढी मुंबईची लोकसंख्या आहे. मुंबई हे एक असे शहर आहे जिथे श्रीमंतांपासून गरीब अशा सर्व प्रकारचा वर्ग इथे आढळतो.

रिझर्व्ह बॅंक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्वाच्या आर्थिक संस्था या शहराला लाभलेल्या आहेत. अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये मुंबईत आहेत. महाराष्ट्र व देशभरातून आपलं नशीब आजमवण्यासाठी लोक इथे येत राहतात. मराठी सिनेसृष्टीसोबत बॉलिवूड म्हणजेच हिंदी सिनेसृष्टीचं मुंबई हे केंद्र आहे. मुंबादेवीवरुन मुंबई हे नाव पडले असं म्हटलं जातं. १९९५ मध्ये बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे अधिकृत नाव ठेवण्यात आहे.

( हेही वाचा : कोकण रेल्वे सुसाट! १ मे पासून ‘या’ गाड्या धावणार विद्युतवेगाने… )

मुंबईचा इतिहास

मुंबईवर अनेक हिंदू शासकांनी शासन केलेलं आहे. १३४३ पर्यंत हा प्रदेश हिंदू राज्यकर्त्यांकडे होता. नालासोपार्‍यात म्हणे १९८५-८६ च्या सुमारास डॉ. भगवानलाल इंद्रजी यांनी संशोधन करुन बर्‍याच गोष्टींचा उलगडा केला होता. तेव्हा त्यांना सम्राट अशोकाच्या काळातील स्तूप, आज्ञाशिला आढळले होते. दहिसर नदीचे संशोधन केल्यावर आदिमानवाच्या काळातील हत्यारेही सापडली होती. म्हणजेच मुंबईला अति-प्राचीन महत्व प्राप्त झाले आहे.

मुंबई किनारपट्टीची सात बेटे होती. पूर्वीच्या काळात मुंबईत ८० बंदरांच्या नोंदी आढळतात. इसवीसन पहिल्या शतकातला तो काळ, त्या कालखंडात सातवाहनांचे राज्य होते. पैठण ही त्यांची राजधानी असल्याची सांगितलं जातं. रोमन, ग्रीक, पर्शियन आणि अरब राष्ट्रातील लोकांशी व्यावसायिक संबंध असल्याने महाराष्ट्र हे खूप मोठे आणि समृद्ध राज्य होते.

हिंदू राजांचं वर्चस्व मुंबईवरुन गेलं आणि पुढे गुजरातच्या मोहम्मदाने मुंबई पादक्रांत केली आणि त्यानंतर १५३४ रोजी पोर्तुगीज लोकांनी मुंबई आपल्या ताब्यात घेतली. त्यांनी सायन, माहिम, बांद्रा, और बेसियन येथे इमारती, चर्च बांधले. १६२५ दरम्यान डच लोकांनी देखील मुंबईवर आपलं राज्य स्थापन केलं होतं. पुन्हा पोर्तुगीजांकडे मुंबई गेली आणि १६६१ साली त्यांनी चार्ल्स द्वितीय ला भेट म्हणून मुंबई देण्यात आली.

ब्रिटिशांच्या ताब्यातील मुंबई

दर वर्षी १० पौंडच्या बदल्यात मुंबई इस्ट इंडिया कंपनीने मुंबई आपल्या ताब्यात घेतली. ब्रिटिशांनी मात्र मुंबईचं स्वरुप बदललं. त्यांनी मिल्स मुंबईला हलवल्या. त्यानंतर ’बॉम बिमा’ हे पोर्तुगीज नाव बदलून इंग्रजांनी ’बॉम्बे’ असं नामकरण केलं. मुंबादेवी ही मुंबईची देवी, कोळ्यांची देवी म्हणून ते मुंबईला मुंबा म्हणायचे.

गेराल्ड ऑंगियर बॉम्बेचे गर्व्हर्नर झाले. त्यांनी गुजराती व्यापारी, पारसी व इतर लोकांना मुंबईकडे आकृष्ट केलं. त्यामुळे मुंबईची लोकसंख्या वाढू लागली. मुंबईतला मराठी माणूस कमी होऊ लागला, त्याची ही सुरुवात होती. १८३५ ते १८३८ पर्यंत रॉबर्ट ग्रॅंट बॉम्बेचे गर्व्हर होते. त्यांच्या काळात अनेक रस्त्याचं काम झालं. मुंबईत पक्के रस्ते निर्माण होऊ लागले.

या शहराचा जलदगतीने विकास होऊ लागला. मुंबई व्यावसायाचे केंद्र झाली. व्हिक्टोरिया टर्मिनस आणि ठाणे दरम्यान भारतातली पहिली रेल्वे धावली. या रेल्वे लाईनचं उद्भाटन १६ एप्रिल १८५३ रोजी करण्यातं आलं. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर इंग्रजांनी मुंबई आपल्या ताब्यात घेतली. हळूहळू मुंबईचे ७ बेट जोडले गेले आणि एक विशाल औद्योगिक आणि कष्टकर्‍यांच्या शहरात मुंबईचे रुपांतर झाले.

बदलती मुंबई

१९ व्या शतकात विक्टोरिया टर्मिनस, जनरल पोस्ट ऑफिस, नगर निगम, वेल्स संग्रहालय, राजाबाई टॉवर आणि बॉम्बे विश्वविद्यालय, एल्फिंस्टन कॉलेज आणि कवासजी जहांगीर हॉल, क्रॉफोर्ड मार्केट, ओल्ड सचिवालय (ओल्ड कस्टम्स हाऊस) अशा अनेक इमारतींचे निर्माण करण्यात आले.

राजा जॉर्ज आणि राणी मेरीच्या भारत यात्रेसाठी १९११ रोजी गेटवे ऑफ इंडिया तयार झालं. आज गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात मुंबईकर व पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळते.

बॉम्बे नावाचे राज्य होते

तुम्हाला आज हे जाणून आश्चर्य वाटेल की आज महाराष्ट्र आणि गुजरात नावाचे दोन वेगळे राज्य आहेत. पण ब्रिटिश इंडियामध्ये बॉम्बे राज्यात गुजरात व महाराष्ट्र ही दोन्ही राज्ये येत होती. आजची मुंबई म्हणजे ब्रिटिशकालीन बॉम्बे नव्हे.

पूर्वी कोलाबा, माहिम, छोटा कोलाबा, माझगाव, वरळी, माटुंगा आणि परळ अशी सात बेटे होती. ही बेटे जोडून मुंबई या विशाल शहराची निर्मिती झाली आहे. प्रत्येकाला मुंबईचं आकषण होऊ लागलं. नशीब आजमवायचं असेल तर मुंबईत गेलं पाहिजे ही भावना दृढ होऊ लागली. पण याचा वाईट परिणाम मुंबईच्या लोकसंख्येवर होऊ लागला.

स्वतंत्र भारतातली मुंबई

१९४७ साली इंग्रज देश सोडून निघून गेले. भाषेच्या आधारावर प्रांत रचना केली गेली. त्यातून वाद विवाद सुरु झाले. मराठी लोकांचं म्हणणं होतं की मुंबईत मराठी बोलणारे मोठ्या प्रमाणात आहेत म्हणून मुंबई महाराष्ट्रात आली पाहिजे. तर दुसरीकडे मुंबईला घडवण्यामागे गुजराती लोकांचा हात होता म्हणून मुंबई गुजरातकडे गेली पाहिजे असं गुजराती लोकांचं म्हणणं होतं.

हा वाद चिघळला. गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन वेगळी राज्ये निर्माण झाली. पण मुंबई कोणत्या राज्याचा भाग होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. असं म्हटलं जातं की पंतप्रधान नेहरु यांना मुंबई केंद्रशासित करायची होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचा मराठी माणूस मागे कसा हटेल? मराठी माणसाने लढा दिला. १०० हून अधिक मराठी हुताम्ये झाले. त्यानंतर सरकारला मराठी माणसासमोर झुकावंच लागलं आणि मुंबई महाराष्ट्रात आली.

बॉम्बे नव्हे मुंबई म्हणा

१ मे १९६० रोजी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली. पुढे बॉम्बे किंवा बंबई या नावांना डावलून या शहराचं नाव मुंबई असं करण्यात आलं. मराठी व कोळी लोकांची देवी मुंबा देवी. या मुंबा देवीच्या नावावरुन मुंबई असे नामकरण करण्यात आले. मुंबा + आई = मुंबई…

म्हणून तर सुरेश भट म्हणतात, ’एवढ्या जगात माय मानतो मराठी.’ तुम्हाला जाणून आनंद होईल की मुंबई हे जगातल्या पाच प्रमुख शहरांपैकी एक शहर आहे. मुंबईच्या एअरपोर्टवर सर्वात अधिक विदेशी विमाने उतरतात.

कष्टकर्‍यांची जननी

खरं पाहता मुंबई ही आईच आहे. कारण मुंबई कधीच कुणाला नाराज करत नाही, कधीच कुणाला उपाशी ठेवत नाही. कष्ट करायची तयारी असेल तर इथे कुणीही राजा होऊ शकतो. देशभरातून लोक इथे येतात आणि पैसे कमावतात. आता तर मुंबईची लोकसंख्या प्रचंड वाढलेली असल्यामुळे येथे ग्राहकही खूप आहेत. अगदी २० – २५ वर्षांपूर्वी जिथे कमी लोकसंख्या होती, तिथे मोठमोठे टॉवर्स उभे राहिलेले आहेत.

कोरोनाकाळाचं जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर नोकरी गेल्यामुळे त्रासलेल्या लोकांना नव-रोजगार सुद्धा मिळालेला आहे. कोरोनाकाळातील रोजगार ही तर मुंबईची करामत आहे. कितीतरी लोकांनी कोरोना काळात नोकरी गेल्यामुळे हार-फुलांचा, भाज्यांचा, मच्छी विक्रीचा व्यवसाय सुरु केला. ही मुंबईची किमया आहे.

कोळी समाज हा इथला प्राचीन समाज मानला जातो. कोलवरुन कोलीय वंश आणि त्यावरुन कोळी असे नामकरण झाले, कोळी हे सातवाहनांचे सरदार मानले जातात. त्याचबरोबर पांचाळ, शाक्य, मालवगण, मल्लवी अशाप्रकारची सोळा जनपदे होती. कोळी म्हणजेच कोल सरदारांमुळे कदाचित कोलाबा, कोल कल्याण, कोलडोंगरी, कोलाड अशी नावे पडली असल्याचा अंदाज आहे. याबाबतीत पुढे संशोधन झाले तर थक्क करणारे पुरावे समोर येऊ शकतात.

तर आपल्या मुंबईला इतकी प्राचीन आणि समृद्ध इतिहास लाभलेला आहे. आज जगाचं लक्ष आपल्या मुंबईकडे असतं. मुंबईचा इतिहास वाचून कोणत्याही मुंबईकराची छाती अभिमानाने भरुन येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here