वरळी किल्ल्यावर झगमगाट, पण वांद्रे किल्ल्याकडे दुर्लक्ष का?

138

वरळी किल्ल्याच्या किरकोळ डागडुजीचे काम हाती घेतानाच आता या किल्ल्याच्या विद्युत रोषणाईचेही काम हाती घेण्यात येत आहे. परंतु किल्ल्याच्या संवर्धनासाठी मोठ्या स्वरुपातील डागडुजी आवश्यक असताना किरकोळ डागडुजी केली जात आहे. मात्र, या किरकोळ डागडुजीच्या तिप्पट खर्च विद्युत रोषणाई आणि सुशोभिकरणावर केला जाणार आहे. मात्र, वरळी किल्ल्याच्या किरकोळ कामांसह विद्युत रोषणाईसह सुशोभिकरणावर भर दिला जात असताना वांद्रे किल्ल्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वांद्रे किल्ल्यावर झगमगाट कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

किल्ल्याच्या कामांसाठी ६३ लाख ४९ हजारांचा खर्च

राज्यातील पुरातत्व खाते अंतर्गत येत असलेल्या किल्ल्यांपैकी मुंबईतील वरळी किल्ला हा पुरातन ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ला आहे. हा वरळी किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाचे स्थानिक शहर नियोजक, वास्तूविशारद यांच्यामार्फत पाहणी करण्यात आली होती. या स्थानिक शहर नियोजक, वास्तूविशारद यांनी वरळी किल्ल्याचे जतन व संवर्धन करणेबाबतचा आराखडा जी-दक्षिण विभागास सादर करण्यात आला. त्यामुळे जी दक्षिण विभागाच्यावतीने आराखडा बनवून त्यानुसार निविदा मागवली होती. पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत असून यासाठी देवांग कंस्ट्रक्शन ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीला किल्ल्याच्या कामांसाठी ६३ लाख ४९ हजार रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.

सुशोभिकरणासाठी ही कंपनी ठरली पात्र

त्याबरोबरच किल्ल्याच्या सभोवतालच्या परिसराचे सुशोभिकरण व विद्युत रोषणाई केली जाणार आहे. या कामांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये खुशबू एंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली. या कामांसाठी विविध करांसह १ कोटी ९९ लाख ७० हजार ३४२ रुपये खर्च केले जाणार आहे. हे काम वर्षभरात पूर्ण होणे अपेक्षित आहे. वरळी किल्ल्याचे जतन व संवर्धनाकरीता स्थापत्य स्वरुपाची व सुशोभिकरणासह विद्युत रोषणाईची कामे केल्यास वरळी कोळीवाडा या राज्य संरक्षित स्मारकांच्या सौंदर्यात भर पडेल व मुंबईतील पर्यटनास चालना मिळून मुंबईच्या वैभवात भर पडणार असल्याचे जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांच्या वक्तव्यावर आठवले म्हणाले…)

जानेवारी २०२० मध्ये उद्यान कक्षाच्या माध्यमातून एच पश्चिम विभागातील वांद्रे किल्ल्याचे सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर करण्यात आला होता. सुशोभीकरणामध्ये किल्ल्याच्या मोडकळीस आलेल्या संरक्षक भिंती पाडून, त्या भिंतींची पुनर्बांधणी करणे, प्रवेशद्वार बनवणे, शहरी वन निर्माण करणे आदी कामे केली जाणार होती. या कामासाठी महापालिकेने कंत्राटदाराची निवड केली आहे. यासाठी एपीआय सिव्हीलकोन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवडही करण्यात आली होती. या कंपनीने विविध करांसह २०.६२ कोटीं रुपयांची बोली लावली होती. परंतु हा प्रस्ताव शीव, माहिम, वरळी आदी किल्ल्यांचे एकत्र प्रस्ताव सादर करावे असे कारण देत हा प्रस्ता फेरविचारासाठी परत पाठवत फेटाळला होता. परंतु दोन वर्षे उलटत आले तरी वांद्रे किल्ल्याच्या सुशोभिकरणाबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल केली जात नाही. परंतु दुसरीकडे वरळी किल्ल्याच्या कामांसाठी विशेष पुढाकार घेतला जात आहे. त्यामुळे जर माहिम, वरळी आणि वांद्रे किल्ल्याच्या विकासाचा एकत्र प्रस्ताव सादर केला जाणार होता, तर अशाप्रकारे स्वतंत्र प्रस्ताव आणून विकासाची कामे का केली जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वरळी किल्ल्याचा इतिहास

वरळीचा किल्ला हा वरळी कोळीवाडा गावाच्या उत्तरेकडील टोकावर वसलेला आहे. दक्षिण मुंबईचे प्रवेशव्दार म्हणून ओळखले जाते. हा किल्ला पोर्तुगीजांनी सन १५६१ च्या सुमारास वरळी टेकडीवर बांधला, जेव्हा शहर फक्त सात बेटांनी बनले होते. हा किल्ला शत्रू जहाजे आणि समुद्री चाच्यांचा शोध म्हणून वापरला जात असे. किल्ल्यामध्ये एक विहीर, एक मंदिर आहे आणि किल्ल्यावरु तसेच, वांद्रे सागरी सेतू यांचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याची तटबंदी हे तोफांसाठीचे व्यासपीट आहेत, भूतकाळातील त्यांच्या लष्करी महत्व असल्याची आठवण करून देतात. हा किल्ला मुंबईच्या पश्चिम किना-यावरील माहिमच्या खाडीपासून लक्ष्य वेधणा-या तीन किल्ल्यांपैकी एक आहे. ज्याच्या उत्तरेस माहिम किल्ला आणि वांद्रे किल्ला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.