मागील चार वर्षांपासून सुरु असलेल्या विक्रोळी रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाच्या खर्चानेही मोठी उडी मारली आहे. रेल्वे मार्गावरील पूल उभारणीचे काम रेल्वे आणि महापालिका संयुक्तपणे करत असून हे काम जलदगतीने करण्याच्या नावाखाली या पूलाचा खर्च तब्बल १०० टक्क्यांनी वाढवलला गेला आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ३७ कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी दिली होती, परंतु प्रत्यक्षात या पूलाच्या कामाच्या खर्चाचा आकडा आता ७१.८१ कोटींवर पोहोचला आहे. परंतु पावसाळा वगळता ३० महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी संबंधित कंत्राटदाराला ४० टक्केच काम करता आलेले आहे. कंत्राटदाराचा फायदा झाला तरी परंतु चार वर्षांपासून विक्रोळीकर वळणाचा प्रवास करता याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
३२ महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही काम अपूर्ण
विक्रोळी रेल्वे स्टेशन येथील लेवल क्रॉसिंग क्रमांक १४ सी येथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्याबाबत स्थायी समितीच्या मंजुरीने १४ मार्च २०१८ मध्ये विविध करांसह ४५.७७ कोटींचे कंत्राट देत यासाठी एच.व्ही. कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड केली होती. मार्च महिन्यात मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्ष कामाला २ मे २०१८ पासून सुरुवात झाली होती. हे काम पावसाळा वगळून १८ महिन्यांमध्ये करणे बंधनकारक होते. त्यामुळे हे काम पावसाळा वगळून १८ महिन्यांमध्ये म्हणजे डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते, परंतु पावसाळा वगळून ३२ महिन्यांचा कालावधी मागील मे महिन्यांमध्ये लोटल्यानंतरही हे काम अद्याप पूर्ण नाही.
(हेही वाचा – चिपळूणच्या परशुराम घाटातील वाहतूक रात्री ‘या’ वेळेत राहणार बंद!)
वाढीव कामांच्या खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर
उलट पूल विभागाने या पुलाचा खर्च १०० टक्क्यांनी वाढवून वाढीव कामांच्या खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला आहे. पूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पुलाच्या जलद बांधकामासाठी सुपर स्ट्रक्चरच्या डिझाईनमध्ये बदल करत सुधारीत तांत्रिक कार्यपध्दतीची अवलंब केला. त्यामुळे हा खर्च वाढल्याचे सांगितले. या रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम हे रेल्वे व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. रेल्वे स्टिल गर्डर वापरणार आहेत. यासाठी आय.आय.टीकडून नव्याने अभिप्राय घेण्यात आला. त्यानुसार पी.एस.सी गर्डर ऐवजी स्टील गर्डर वापरण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये विविध करांसह ४५.७७ कोटी रुपयांचे मंजूर असून त्यामध्ये ४२.६७ कोटी रुपयांची अतिरिक्त वाढ झाली असून या पुलाचा खर्च आता ८८.४५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
Join Our WhatsApp Community