नववर्षाच्या पूर्वसंध्येला माता वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 14 जण जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील पोलिसांनी सांगितले की, सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आहे. चेंगराचेंगरीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये नववर्षानिमित्त मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक पोहोचले होते. दरम्यान, चेंगराचेंगरी झाली त्यामुळे अनेक भाविक दर्शन न घेताच परतत आहेत. मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब येथील भाविकांचा समावेश आहे.
म्हणून झाली चेंगराचेंगरी
ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. गोपाळ दत्त म्हणाले, माता वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही नेमका आकडा समोर आलेला नाही. मृतांचे पोस्टमार्टम करायचे आहे. याशिवाय जखमींना उपचारासाठी नारायणा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आतापर्यंत 14 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मू-कश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले की, ही घटना पहाटे 2.45 वाजता घडली. ते म्हणाले की, सुरुवातीच्या अहवालात आम्हाला कळले आहे की काही लोकांमध्ये वाद झाला आणि हाणामारी झाली. यानंतर लोक पळू लागले, त्यामुळे हा अपघात झाला.
( हेही वाचा: वाढता वाढता वाढे कोविडचा आजार: दिवसभरात ५६३१ रुग्णांची नोंद )
भाविकांची मोठी गर्दी झाली होती
वैष्णो देवी मंदिर परिसराचे कर्तव्य अधिकारी जगदेव सिंह यांनी सांगितले की, मृतांपैकी एक जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील रहिवासी आहे. याशिवाय अन्य 11 लोक देशातील विविध राज्यांतील आहेत. मृतांमध्ये आतापर्यंत 7 जणांची ओळख पटली आहे. अन्य ५ जणांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणाले की, सध्या अर्धकुवारी, बाणगंगा येथून होणारी यात्रा बंद करण्यात आली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सुमारे 70 ते 80 हजार भाविक पूजेसाठी मंदिरात पोहोचले होते, असे जगदेव सिंह पुढे म्हणाले.
Join Our WhatsApp Community