कोरोनासोबतच अफवांचीही पसरतेय लाट… असा पोखरतोय व्हायरल मेसेजचा ‘व्हायरस’! तथ्य आले समोर

इतक्या सोप्या उपायांनी जर कोरोना बरा झाला असता, तर कशाला हवी आहे लस आणि महागडी इंजेक्शनं? हे तथ्यं आपण समजून घेण्याची गरज आहे.

कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे लोकांच्या मनात एक तणावाचं वातावरण आहे. पण याबरोबरच अफवांचीही महाभयंकर लाट सध्या थैमान घालत आहे. दुर्दैवाने आपल्या देशात आजार व्हायरसमुळे कमी आणि अफवांमुळे जास्त पसरतो. आता दुसरी लाट सुरू झाल्यानंतर अफवांचा व्हायरस पसरवणारे उंदीर बिळातून बाहेर येण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. या उंदरांचं एकच काम फक्त नासधूस करणे. मग कधी भीती पसरवण्यासाठी जूने व्हिडिओ व्हायरल करणं, वैद्यकीय क्षेत्रातील काडीचीही अक्कल नसताना कुठले तरी उपाय सांगणं, कोरोनाचा संबंध आकाशातील ग्रह ता-यांशी जोडून कोरोना कधी जाणार यावर आपलं ज्ञान पाजळवणं, अशा एक ना अनेक गोष्टी करुन हे लोक समजाची नासधूस करत असतात. हे सगळं पाहिल्यावर पुलंच्या कथाकथनातील एक वाक्य आठवतं, ‘आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय याचा कुठलाही विचार न करता आपलं मत ठोकून द्यायचं.’ याप्रमाणे या अफवांच्या खाद्यावर हे उंदीर आपली उपजीविका करत असतात. प्रसारमाध्यमं ही खरं तर समाजाचा आरसा म्हणून काम करतात, पण प्रसारमाध्यमं सुद्धा अशा अफवांना सर्रासपणे दुजोरा देऊन आपली प्रतिमा मलीन करुन घेतात.

धूम्रपान करणा-यांना कोरोना होत नाही अशी एक अफवा पसरली होती. त्या अफवेला उगाच सीएसआयआरचा दाखला जोडून व्हायरल करण्यात आलं. पण याबाबतीतलं तथ्य आता समोर आलं आहे.

काय आहे तथ्य?

धूम्रपान करणारे आणि शाकाहारी अन्नपदार्थांचे सेवन करणा-या लोकांमध्ये सीरो पॉझिटिव्हिटी कमी आहे, तसेच ओ रक्तगट असणा-या लोकांना कोरोनाचा धोका कमी संभवतो, अशी एक बातमी(अफवा) व्हायरल होत आहे. याला वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे(सीएसआयआर)च्या सर्वेक्षणाचा आधार देण्यात आला. पण पीआयबीच्या फॅक्ट चेक विंगने ही माहिती खोटी असल्याचे सांगितले आहे. धूम्रपान किंवा शाकाहारी लोक कोरोनापासून सुरक्षित असल्याचा कोणताही निष्कर्ष सिरॉलॉजिकल अभ्यासाद्वारे काढण्यात आला नसल्याचे, पीआयबीच्या फॅक्ट चेक विंगने सांगितले आहे. सीएसआयआर कडून कुठलीही माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली नसल्याचेही या फॅक्ट चेक मध्ये सांगण्यात आले आहे. तसेच ओ रक्तगट असलेल्या लोकांनाही कोरोना झाल्याची माहिती नागरिकांनीही दिली आहे. त्यामुळे ही माहिती खोटी असल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचाः गुड न्यूज…राज्यात गेल्या सहा दिवसांत ४ लाख ४२ हजार रुग्ण कोरोनामुक्त!)

मुंबई पोलिसांनीही केले सावध

याचप्रमाणे मुंबई पोलिसांनी सुद्धा अशाच एका खोट्या व्हायरल मेसेजचे भांडे फोडले आहे. सैंधव मीठ आणि कच्चा कांदा खाल्ल्याने 15 मिनिटांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह होत असल्याचे, या मेसेजमध्ये सांगण्यात आले होते. पण ही माहिती खोटी असल्याचे मुंबई पोलिसांनी ट्वीट करत सांगितले आहे. घरगुती औषधे ही कोरोनासारख्या आजारावर कधीही उपयुक्त नाहीत, असे मुंबई पोलिसांनी ट्वीट करत म्हटले आहे. तसेच कोरोनाची लक्षणे असल्यास आपल्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधून, योग्य उपचार घेण्याचा सल्लाही पोलिसांनी दिला आहे.

सावध रहा

अशा अनेक प्रकारच्या खोट्या पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. आज कोरोनाची भीषण परिस्थिती आहे. सध्याच्या काळात लोक जीव मुठीत घेऊन जगत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर असं काही दिसलं की लोकांना आशेचा किरण दिसतो आणि त्यामुळे ते या अफवांना बळी पडतात. नकळतपणे अशा पोस्ट आपल्याकडून फॉरवर्ड केल्या जातात. यापासून सावध राहण्याची आपल्याला गरज आहे. कारण इतक्या सोप्या उपायांनी जर कोरोना बरा झाला असता, तर कशाला हवी आहे लस आणि महागडी इंजेक्शनं? हे तथ्यं आपण समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे अशा अर्थहीन आणि तथ्यहीन पोस्ट फॉरवर्ड करुन स्वतः पापाचे धनी होऊ नका. आज घरी राहणं, मास्क लावणं, अंतर ठेवणं या नियमांसोबतच असल्या पोस्टकडे दुर्लक्ष करणं, हा नियमही पाळणं गरजेचं आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here