लॉकडाऊनमध्ये बोगस कॉल सेंटरचा सुळसुळाट! तीन कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा

65

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात मुंबईसह आजूबाजूच्या शहरांत मोठ्या प्रमाणात बोगस कॉल सेंटर उघडली गेली आहेत. या कॉल सेंटर मधून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी नागरिकांची ऑनलाइन फसवणूक होत आहे. मुंबई पोलिस तसेच ठाणे पोलिसांनी मागील काही महिन्यांत अनेक बोगस कॉल सेंटर उध्वस्त करुन कॉल सेंटर मालकांना अटक केली आहे. बुधवारी गुन्हे शाखा आणि सहार पोलिसांनी तीन बोगस कॉल सेंटरवर छापे मारुन फसवेगिरी उघडकीस आणली आहे.

अशी करत होते फसवणूक

लॉकडाऊन काळात मुंबईत शहरात बोगस कॉल सेंटरचा धंदा फोफावला आहे. नागरिकांना आयुर्वेदिक औषधे, शेअर मार्केटिंग तसेच नोकरी देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात ऑनलाइन फसवणूक होत आहे. मालाड पश्चिम चिंचोली बंदर, युरेका टॉवर्स आणि लिंक वे इस्टेट येथील गोल्डलाईन बिझनेस सेंटर या ठिकाणी बोगस कॉल सेंटर चालवले जात असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखा कक्ष-११ला मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने दोन्ही ठिकाणी छापेमारी केली. या दोन्ही कॉल सेंटरमध्ये सुमारे ८० ते ८५ कर्मचारी काम करत असल्याचे समोर आले. यात तरुणींचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

(हेही वाचाः बोगस लसीकरण : पाचवा गुन्हा दाखल, सहावी अटक!)

या दोन्ही कॉल सेंटरमध्ये शेअर मार्केटमध्ये २०० डॉलर्स गुंतवणूक करा आणि दररोज पंधराशे ते दोन हजार रुपये कमवा, अशी ऑफर दिली जात होती. भारतातील तसेच आखाती देशातील नागरिकांना इंटरनेट कॉलिंग मार्फत फसवणूक करत असल्याचे या चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी दोन्ही कॉल सेंटरच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.

बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून लूट

साकिनाका मेट्रो स्थानकाजवळील एनआयव्ही आर कॉर्पोरेशन पार्क याठिकाणी युनिवर्सल गृपच्या नावाखाली विमान कंपन्या, पंचतारांकित हॉटेल, कॉर्पोरेट क्षेत्र या ठिकाणी जॉब असल्याचे सांगून बेरोजगारांकडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ऑनलाइन पैसे घेतले जात होते. या कॉल सेंटर मधून समाज माध्यमावर खोट्या जाहिराती देऊन, त्याखाली मोबाईल क्रमांक देऊन बेरोजगारांची फसवणूक करण्यात येत होती. या प्रकरणी सहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच सहार पोलिसांनी या कॉल सेंटरवर छापा टाकून ११ पुरुष, २ महिला अशा एकूण १३ जणांना अटक करुन, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(हेही वाचाः एनआयएची दुसऱ्यांदा छापेमारी, प्रदीप शर्माच्या अडचणीत वाढ!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.