मुंबईत ‘स्पेशल 26’ चित्रपटाप्रमाणे छापे; बनावट ईडी अधिका-यांनी केली कोट्यावधींची लूट

बाॅलिवूडमधील गाजलेला चित्रपट स्पेशल 26 मध्ये खोटे अधिकारी बनून जशी लूट करण्यात आली होती, तशीच लूट मुंबईत करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील झवेरी बाजार परिसरात खोट्या ईडी अधिका-यांनी छापे टाकून कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांची लूट केली आहे. झवेरी बाजारातील एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर चार अज्ञात लोकांनी छापा टाकला आणि स्वत:ला ईडीचे अधिकारी असल्याचे सांगितले. आरोपींनी तक्रारदार व्यावसायिकाच्या कार्यालयातील एका कर्मचा-यालाही बेड्या घातल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आरोपींनी कार्यालयातून 25 लाख रुपये रोख आणि तीन किलो सोने चोरून नेले.

कोट्यावधी रुपयांची केली लूट

बनावट ईडी अधिका-यांनी लुटलेल्या सोन्याच्या दागिन्यांची एकूण किंमत 1 कोटी 70 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 394,506 (2) आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमे-याच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

( हेही वाचा: ‘वंदे मातरम्’: कादंबरीतील कविता ‘अशी’ बनली भारताचे ‘राष्ट्रीय गीत’ )

मुंबईतील सर्वात मोठा सराफा बाजार

काळबादेवी इथला झवेरी बाजार हा मुंबईतील सर्वात मोठा सराफा बाजार आहे. अंबालाल झवेरी हे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईतील सर्वात सुप्रसिद्ध सोनार होते. संपूर्ण देशाला पुरवठा होणा-या सोने- चांदीची 60 ते 65 टक्के उलाढाल याच बाजारातून होते. हा बाजार मुंबईची जुनी ओळख आहे. या बाजारात 4 लाख कारागीर काम करतात. भारतातली सर्वाधिक सोन्या, चांदीच्या दागिन्यांची निर्यात ही झवेरी बाजारातून होते. 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here