‘३१ डिसेंबर’च्या आधीच धारावीत धाड! बनावट विदेशी मद्याचा 3 लाखांचा माल जप्त

97

31 डिसेंबरच्या आधीच धारावीत बनावट विदेशी मद्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाला यश आले आहे. सायन-माहिम लिंक रोडवर नवरंग कंम्पाऊंड, फ्लॉट क्रमांक १ मध्ये धारावी अचानक छापा घातला असता विविध १६५ प्रकारच्या विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, ११७ मद्याची बुचे, १२६ मद्य बॉटलच्या कॅप्स, ४० अँबसेल्यूट व्होडकाचे टोपन, विविध ब्रॅन्डच्या विदेशी मद्याची लेबले, ड्रायर मशीन, मार्कर, टूथ ब्रश व १२ मोठ्या प्लॉस्टिक गोण्या इत्यादी साहित्यासह एकूण रुपये ३ लाख ७० हजार ३९० रुपये किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला.  या गुन्ह्यामध्ये कल्पेश भरत वाघेला यास महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. आरोपीस मंगळवार, २८ डिसेंबरपर्यंत कोठडीचे आदेश दिले आहेत.

भरारी पथकाची कारवाई

राज्य उत्पादन शुल्क, मुंबई आयुक्त कांतीलाल उमाप, ठाण्याचे विभागीय उप आयुक्त सुनिल चव्हाण, श्रीमती उषा वर्मा तसेच राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर अधीक्षक सी.बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ मुंबई शहर कार्यालयाने ही कारवाई केली आहे. उच्च प्रतीचे विदेशी मद्य, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, विविध ब्रँडच्या मद्याचा साठा स्वतः जवळ बाळगून त्याची विक्री आपल्या ओळखीच्या लोकांना करण्याचा उद्देश होता. या कारवाईमध्ये श्रीमती प्रज्ञा राणे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २, मुंबई शहर व अविनाश पाटील, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, आय विभाग मुंबई शहर, आर. जे. पाटील, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एच विभाग, मुंबई शहर, व जवान जी. डी. पवार, प्रविण झाडे, विनोद अहिरे, बालाजी जाधव, श्रीमती महानंदा बुवा यांनी सहकार्य केले. या गुन्ह्यातील तपासी अधिकारी विनोद शिंदे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २, मुंबई शहर हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

( हेही वाचा : नवाब मलिकांकडून मुस्लिमांची दिशाभूल! काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? )

जनतेस आवाहन

जनतेस आवाहन करण्यात येते की, अवैध बनावट मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्र. १८०० ८३३ ३३३३ व व्हॉटस अप क्र. ८४२२००११३३ संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.