बनावट नोटा चलनात आणण्यासाठी बाळगणाऱ्या इडली व्यवसायिकाकडून नाशिक शहरातील मुंबई नाका पोलिसांनी तब्बल पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका यात्रोत्सवात गर्दीचा फायदा घेत बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब मुंबई नाका पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर नवरात्रोत्सवाचा बंदोबस्त सांभाळत वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नकली नोटा प्रकरणी सतर्क होते.
(हेही वाचा – देशात ‘या’ वर्षी धावणार पहिली बुलेट ट्रेन, रेल्वे मंत्र्यांनी केली मोठी घोषणा)
एका परप्रांतीयाकडे बनावट नोटा असल्याचे पोलिसांना गोपनीय माहितीनुसार कळाले. यावरून पोलिसांनी सापळा रचून संशयित मलायारसन मदसमय (३३, मुळ राहणार ३९, ईस्टमार्ग कायथर, पण्णीकार, कुलूम, तुदूकुडी, तामिळनाडू) यास सापळा रचून भारत नगर येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे ५०० रुपये किमतीच्या ४० बनावट नोटा व दोन हजार रुपये किमतीच्या २४४ बनावट नोटा अशा ५ लाख ८ हजार रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या तर ३ हजार ३०० रुपये रोख रक्कम त्याच्याकडे मिळाली.
संशयित मलायारसन हा नाशिकमध्ये वास्तव्यास असून त्याने या नोटा आणल्या कुठून व यामध्ये अजून कोण-कोण सहभागी आहेत याचा आता पोलीस तपास घेत आहेत. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रौंदळे करीत आहेत.