चक्क खोट्या नोटा देऊन फसवणुकीपासून वाचला

आपली फसवणूक करण्यासाठी आलेल्या दोन कॅमेरुन नागरिकांना बोरीवलीतील ज्वेलरने उल्लू बनवले. त्यासाठी त्याने काय शक्कल लढवली?

87

नोटा झाल्या खोट्या, फायदा झाला मोठा… हे ऐकायला जरा विचित्र वाटत असेल. कारण खोट्या नोटा देऊन लोकांची कशी फसवणूक केली जाते, हे तर जगजाहीर आहे. पण खोट्या नोटा देऊन आपली फसवणूक होण्यापासून कोणी वाचलं आहे, हे सांगितलं तर तुम्हाला खोटं वाटेल. पण खरंच, खोट्या नोटा देऊन बोरीवलीतील एका ज्वेलरचा मोठा फायदा झाला आहे. आपली फसवणूक करण्यासाठी आलेल्या दोन कॅमेरुन नागरिकांना बोरीवलीतील ज्वेलरने उल्लू बनवले. त्यासाठी त्याने काय शक्कल लढवली?

काय झाले नेमके?

झोन पॅसिफिक आणि फ्रँक स्टीफन अशी पळून गेलेल्या कॅमेरुन नागरिकांची नावे आहेत. तरुण कच्छवा(२९) असे अटक करण्यात आलेल्या ज्वेलरचे नाव आहे. कच्छवा हा बोरीवली येथे राहणारा असून, त्याची काही महिन्यांपूर्वी कॅमेरुन नागरिक असलेल्या फ्रॅंक स्टीफन याची ओळख समाज माध्यमावर झाली होती. स्टीफनने आपणही ज्वेलरच्या उद्योगात असून, त्याच्याबरोबर व्यवसाय करायचा आहे, असे कच्छवाला सांगितले.

(हेही वाचाः कबाबच्या सळईने फाडले काळीज…कारण वाचून थक्क व्हाल)

शाई काढण्याची झाली घाई

६ ऑगस्ट रोजी या दोघांनी कच्छवा याला संपर्क करुन आम्ही मुंबईत गोरेगाव येथे एका हॉटेलमध्ये उतरलो आहोत, असे सांगितले. तसेच आमच्याकडे ७० दशलक्ष डॉलर्स असून त्यांना एक प्रकारची विशिष्ट शाई लावल्यास त्याच्यावरील डाग निघून जातो, ती शाई देखील आमच्याकडे आहे. मात्र डॉलरला शाई लावल्यानंतर भारतीय चलनातील २ हजारच्या नोटेत काही वेळ गुंडाळून ठेवावे लागते. आमच्याकडे दोन हजारांच्या नोटा नाहीत तू व्यवस्था कर, असे सांगून कच्छवालाला हॉटेलवर बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी डेमो म्हणून त्याच्याजवळ असणाऱ्या एक डॉलरला शाई लावून कच्छवाने आणलेल्या दोन हजारच्या नोटेत गुंडाळून ठेऊन काही वेळाने बाहेर काढली असता डॉलर वरील डाग नाहीसा झाला होता.

घाबरुन केला पोबारा

या दोघांनी कच्छवाला २ हजार रुपयांच्या सुमारे ३९ लाख ६४ हजार रुपयांची व्यवस्था करण्यास सांगितले. मोबदल्यात २० टक्के रक्कम आम्ही तुला देऊ, असे त्याला आश्वासन दिले. कच्छवाने मान्य केले आणि या दोघांना मालाड येथील माइंडस्पेस या हॉटेलची एक खोली स्वतःच्या नावाने बुक करुन राहण्यास दिली. मी पैशांची व्यवस्था करतो, असे सांगून कच्छवा निघून गेला. मात्र पैशांची व्यवस्था न झाल्यामुळे कच्छवाने दोन हजारच्या नोटांच्या ३९.६४ लाख रुपयांच्या रंगीत झेरॉक्स काढून, त्याचे बंडल घऊन हॉटेलवर आला व दोघांना ती रक्कम देऊन निघून गेला. दोघांनी मंगळवारी रात्री त्या नोटा बघितल्या असता, त्या नोटा बोगस असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कच्छवाने आपल्याला पकडून देण्याची योजना आखल्याच्या संशयातून दोघांनी नोटांची बॅग खोलीतच टाकून हॉटेल व्यवस्थापकांना न कळवता तेथून पळून गेले.

(हेही वाचाः मुंबईत नायजेरियन टोळी ड्रग्ज व्यवसायातून दिवसाला कमवते इतके कोटी…)

कच्छवाला अटक 

बुधवारी सकाळी हॉटेलचे सफाई कर्मचारी खोली साफ करण्यासाठी गेले असता, त्यांना हे दोघे परदेशी नागरिक आणि त्यांचे सामान सापडले नाही. खोलीत केवळ एकच बॅग होती, ती तपासली असता त्यात नोटा बघून हॉटेल कर्मचा-याने ताबडतोब व्यवस्थापकाला कळवले. हॉटेल व्यवस्थापकाने खोली बूक करणाऱ्या तरुण कच्छवाशी संपर्क साधला असता, हे दोघे कुठे गेले आणि खोलीत नोटांची बॅग विसरुन गेले असल्याचे सांगितले. त्यावेळी कच्छवाने त्या नोटा खोट्या असून फेकून द्या, असे व्यवस्थापकाला सांगितले. हॉटेल व्यवस्थापकाने या प्रकरणी बांगूर नगर पोलिसांना कळवले असता, पोलिसांनी घटनास्थळी येऊन नोटांची भरलेली बॅग ताब्यत घेतली.त्यावेळी त्यात दोन हजार रुपयांच्या बोगस नोटा सापडल्या. याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तरुण कच्छवाला अटक करुन, दोन्ही परदेशी नागरिकांचा शोध सुरू केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.