लालपरी… महाराष्ट्राची शान… पण या लालपरीच्या कर्मचा-यांकडे मात्र शासनाने कायमच दुर्लक्ष केले. कधी वेतनाची बोंब, कधी पगारासाठी आंदोलन. नेहमीच आपल्या हक्कांसाठी या लालपरीच्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागते. मात्र इतके असूनही, कोरोना सारख्या संकटाच्या काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांनी एसटी रस्त्यावर धावत ठेवली. लोकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असणारे हे एसटी कर्मचारी कोरोना संकटातही आपले गाव सोडून शहरात आले. याचा फटकाही अनेक कर्मचाऱ्यांना बसला. कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या २४५ एसटी कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र त्यांच्या मृत्यूचे सूतक ना एसटी मंडळाला, ना राज्य सरकारला. २४५ एसटी कर्मचाऱ्यांपैकी फक्त ११ कर्मचाऱ्यांच्या वारसांना आतापर्यंत ५० लाखांची आर्थिक मदत मिळाली असून, बाकीचे मात्र मदतीपासून अजूनही वंचित आहेत. याला कारणीभूत ठरले आहे, महामंडळाने काढलले परिपत्रक. महामंडळाने परिपत्रक काढले खरे, पण परिपत्रकातील जाचक अटींचा फटका आता मृत कामगारांच्या नातेवाईकांना बसत आहे.
(हेही वाचाः धक्कादायक… अवघ्या पाच दिवसांत लालपरीच्या २६ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू!)
वारसांना नोकरीही नाही
एकीकडे बहुतांशी कर्मचार्यांना आर्थिक लाभ मिळाला नसताना, त्यांच्या वारसांना सुद्धा अनुकंपा तत्वावरील नोक-या मिळालेल्या नाहीत. अगोदरच अनुकंपा तत्त्वाच्या नोकरीसाठी राज्यातील अनेक विभागात भली मोठी प्रतीक्षा यादी असून, आता सध्या जे कर्मचारी कोरोनामुळे मृत्यू पावले, त्यांच्या वारसांना अशा परिस्थितीत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकत नाही. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीवरील, तसेच सध्या कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नव्याने नोकरी मागणार्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियम अटी व निकष बदलून एक वेगळा पर्याय म्हणून तात्काळ पात्रतेनुसार नोकऱ्या देण्यात याव्यात, अशी मागणी आता एसटी संघटना करू लागल्या आहेत.
(हेही वाचाः कोरोनाने मृत्यु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपये द्या! परिवहन मंत्र्यांची मागणी )
परिवहन मंत्र्यांना संघटनेचे पत्र
परिवहन मंत्री अनिल परब यांना महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी पत्र लिहिले असून, कोरोनामुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी त्यात केली आहे. तसेच त्यांनी एसटी महामंडळाने काढलेल्या परिपत्रकातील जाचक अटींवर देखील बोट ठेवले आहे. सदर परिपत्रकात प्रवाशांशी प्रत्यक्ष संपर्कात येणारे चालक-वाहक, स्थानकावरील काम करणारे वाहतूक नियंत्रक, तसेच सुरक्षारक्षक हे सहाय्य मिळण्यासाठी पात्र ठरतील, असे नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे बहुतांशी मृत कर्मचारी सहाय्य मिळण्यास पात्र ठरले नाहीत. या परिपत्रकात बदल करावा, अशी मागणी देखील बरगे यांनी केली आहे.
(हेही वाचाः २१० एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर परिवहन मंत्री म्हणतात, आता लस द्या! )
संपर्कामुळे होतात कोरोनाबाधित
खरे तर चालक/वाहक ज्यावेळी कामगिरीवरुन आगारात येतात, त्यावेळी वाहकांचा संपर्क रोकड शाखेतील कर्मचाऱ्यांशी येतो. तसेच चालकांचा संपर्क कार्यशाळेतील यांत्रिक कर्मचाऱ्यांशी येतो. याशिवाय आगार व्यवस्थापक, चालक/वाहकांची कामगिरी लावणारे पर्यवेक्षक, तसेच इतर कर्मचारी यांचा हस्ते परहस्ते संबंध येतो. त्याचप्रमाणे विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यालय व एस.टी.महामंडळाची इतर सर्व कार्यालये या ठिकाणी सुद्धा कामगिरीवर येणारे कर्मचारी, पर्यवेक्षक, अधिकारी हे बस, रेल्वे व इतर वाहनांतून कामगिरीवर येतात. त्यामुळे त्या सर्वांचा हस्ते परहस्ते इतर नागरिकांशी संपर्क येतो व त्यामुळे सुद्धा बरेच कर्मचारी व अधिकारी कोरोनाबाधित होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे.
(हेही वाचाः एसटीच्या कर्मचाऱ्यांची शासनाकडून ‘भंकस’)
कर्मचा-यांच्या कुटुंबियांचे होतात हाल
उदाहरण द्यायचे झाले तर एक चालक कामगिरीवर असताना कोरोनाबाधित झाला व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांचा भाऊ सोबत आला होता. तो सुद्धा कोरोनाबाधित झाला एका महिन्याच्या आत दोघेही कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये दोघांच्या दोन पत्नी, तसेच चार लहान मुले आहेत. आता त्यांच्या घरी नोकरी करणारे कुणीही नसून संपूर्ण कुटुंब अडचणीत सापडले आहे. तसेच काही कर्मचारी कोरोनाबाधित झाले, त्यानंतर ते कोरोना या आजारातून बरे झाल्यानंतर काही दिवसांनी कोरोनानंतर होणाऱ्या इतर आजारांमुळे मृत्यू पावले. त्यामुळे तेसुद्धा परिपत्रकानुसार आर्थिक लाभ मिळण्यास पात्र ठरत नाहीत. अशा अनेक अडचणींमुळे कर्मचारी आर्थिक लाभापासून वंचित असल्याचे बरगे यांनी म्हणत महामंडळाचे या सर्व बाबींकडे लक्ष वेधले आहे.
(हेही वाचाः मे महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना ‘नो पेमेंट’?)
Join Our WhatsApp Community