दि ब्लाईंड रिलीफ असोसिएशनच्या मुंडले शाळेने केला विश्वविक्रम

209

नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी नागपूरच्या थंडीत 5000 किलो भाजी बनवून नवा विक्रम केला. यावेळी मात्र 5 हजार किलो भाजीपाला बनवण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर नसून हा विक्रम नागपूरच्या मुंडले इंग्लिश स्कूल ऑफ ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या विद्यार्थ्यांच्या नावावर होणार आहे.

शाळेतील 1200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस समरसता भाजी या नावाने समरसता दिवस म्हणून साजरा केला जातो. यासोबतच नाताळचा सण डोळ्यासमोर ठेवून याचे आयोजन करण्यात आले होते. ‘रजत महोत्सवी वर्षानिमित्त’ दि.ब्लाईंड रिलीफ असोसिएशन नागपुर मुंडले इंग्लिश मिडीयम शाळेतील 1200 विद्यार्थ्यांनी मिळून 5000 किलो मिश्र भाजी बनवली. ज्यात अनेक रुचकर व पौष्टिक भाज्या व अस्सल भारतीय मसाले वापरण्यात आले होते.

(हेही वाचा 2,50,000 नागरिकांना गिळंकृत करणारी ख्रिसमसनंतरची ‘ती’ काळरात्र)

‘शून्य कचरा मोहिमेअंतर्गत’ राबविण्यात आला

समरसता भाजी बनविण्याचा कार्यक्रम रविवार, २५ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी सात वाजता अन्नपूर्णेची पूजा करून सुरू झाला. प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील १२६४ विद्यार्थ्यांनी जवळपास चार तासांचा अवधी घेत समरसता भाजी बनवली. या भाजीचे वाटप प्रथम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर निशुल्क भाजी वाटप शाळेतील सहभागी विद्यार्थी व त्यांच्या परिवारातील सदस्य, शाळेतील शिक्षक तसेच अनेक धर्मदाय संस्था, स्थानिक भेट देणाऱ्या मंडळींना करण्यात आले. हा सर्व कार्यक्रम ‘शून्य कचरा मोहिमेअंतर्गत’ राबविण्यात आला होता. विविधता असताना देखील अतिशय शांततापूर्ण व एकत्रितपणे हा कार्यक्रम संपन्न झाला. विविध भाज्या, विविध स्वाद व पोषक मूल्ये यांच्या एकत्रित मिश्रणात तयार झालेल्या या भाजीने तृप्तीची अनुभूती दिली. समाजाला एकात्मता, सांघिक प्रयत्न व सहयोग यांचा संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक, पालक, कार्यक्रम समिती, माजी विद्यार्थी यांच्या सुसंवाद व एकोप्याने पूर्णत्वास आला.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

या कार्यक्रमाचा उद्देश मुलांना चुकीच्या खाद्य सवयींपासून परावृत्त करीत पौष्टिक खाद्याचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवणे व उत्तम खाद्य प्रवृत्तीचे बीजारोपण करणे हा होता. ५० विविध भाज्या व त्यातील पोषक मूल्ये यांची माहिती देणारे विविध फलक तयार करण्यात आले होते. यादरम्यान सकारात्मकतेची भर घालत काही सांस्कृतिक कार्यक्रम जसे, शाळेतील विद्यार्थिनींचे लेझीम सादरीकरण, संगीत चमूचे एकत्रित सादरीकरण व कलेशी निगडित काही कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. या वैविध्यपूर्ण प्रकल्पाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या लोगो सहित प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शाळेचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे, सचिव  नागेश कानगे, मुख्याध्यापक डॉ. सौ. रूपाली हिंगवे, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका मेघा पाध्ये, पर्यवेक्षिका शिल्पा डोंगरे, शाळा प्रशासन, यांच्या मार्गदर्शनाने व अथक परिश्रमाने हा कार्यक्रम संपन्न झाला. नागपूर शहरातील सर्व हितचिंतकांचे मोलाचे सहकार्य या विक्रमी उपक्रमास प्राप्त झाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.