मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात; डिव्हाईडरचा राॅड कारच्या आरपार घुसला

पुणे-मुंबई महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. डिव्हाईडरचा अख्खा राॅड कारच्यामधून आरपार गेला. अपघातानंतरचे हे फोटो पाहिल्यावर गाडीतून प्रवास करणा-यांची काय अवस्था झाली असेल, असेच मनात येते. पण सुदैवाने तिघांच्यामधून डिव्हायडरचा राॅड आरपार गेला. या अपघातात एका प्रवाशाला गंभीर इजा झाली आहे. त्या प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात शनिवारी 18 मार्चला साडे सातच्या सुमारास सोमाटणे फाट्यावर झाला. मुंबईवरुन सोमाटण्याकडे वळताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला अन् गाडी थेट डिव्हाईडरमध्ये घुसली. या कारमधून चालक आणि दोन प्रवासी महिला असे एकूण तीन जण प्रवास करत होते. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

( हेही वाचा: सरन्यायाधीशांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा; विरोधी पक्षाच्या खासदारांचे द्रौपदी मुर्मू यांना पत्र )

शुक्रवारीही झाला होता अपघात

दरम्यान, शुक्रवारी याच परिसरात कारने ट्रकला मागून धडक दिली होती. अर्धी कार ट्रकखाली अडकल्याने तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. ही कार मुंबईहून पुण्याकडे जात होती. उर्से टोलनाक्याजवळ कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की अर्धी कार ट्रकखाली गेली. यामुळे कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर महामार्ग पोलिसांनी यंत्रणाच्या मदतीने यातील वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here