दसऱ्यानिमित्त धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी माळवदावर (पत्रे) गेल्यानंतर १२ वर्षीय मुलाला विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेनंतर या १२ वर्षीय मुलाच्या मदतीसाठी त्याचे वडील धावले. त्यांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही दुर्दैवी घटना तुळजापूर तालुक्यातील खडकी गावात घडली आहे.
(हेही वाचा – रशियातील शाळेत अंदाधुंद गोळीबार, 7 विद्यार्थ्यांसह 13 जण ठार)
विजेचा धक्का बसल्यानंतर या दोघांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच ते दोघे मरण पावल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन श्यामराव भंडारे (वय ३५), जय सचिन भंडारे (वय १२) या दोघांचा मृत्यू झाला. सचिन हे मोलमजुरीचे काम करत होते. जय हा गावात सहावीमध्ये शिकत होता. सचिनच्या मागे त्यांची पत्नी, एक दहा वर्षांची मुलगी, आई, वडील व तीन भाऊ असा परिवार आहे.
दसऱ्याची धुणी धुतल्यानंतर जय गच्चीवर गेला होता. त्याच वेळी विजेचा प्रवाह आल्यामुळे त्याला विजेचा धक्का बसला. हा धक्का बसल्यानंतर जय हा जोरात ओरडू लागला. तो जोरात ओरडल्यामुळे सचिन हे जयला वाचवण्यासाठी गेले. यानंतर माळवदावर मुलाला बाजुला करत असताना सचिन यांनाही विजेता धक्का बसला. दोघेही मृत्यूमुखी पडले यामुळे गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.