मुलाच्या अंत्यविधीसाठी पैसे उसने घेतले! पण ते फेडता आले नाहीत म्हणून वडिलांनी…

मुलाचा अंत्यविधी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे, त्याने गावातील सावकाराकडून ५०० रुपये उसने घेऊन मुलावर अंत्यसंस्कार केले.

151

मुलाच्या कफनसाठी उसने घेतलेले ५०० रुपये फेडू न शकल्यामुळे, पित्याने आपले जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई जवळ असणाऱ्या पालघर जिल्ह्यात घडला आहे. गरिबीमुळे महिलेला मुलगा आणि पती दोघांना गमवावे लागले आहे. याप्रकरणी मोखाडा पोलिसांनी उसने दिलेल्या ५०० रुपयांसाठी त्रास देणाऱ्या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुलाच्या अंत्यविधीसाठी घेतले उसने पैसे

काळू पवार (४३) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काळू पवार हा पालघर जिल्हयातील मोखाडा आसे गाव येथे पत्नी सावित्री व तीन मुलांसह राहत होता. काळू पवार याला १५ आणि १३ वर्षांच्या दोन मुली असून, १४ वर्षांचा एक मुलगा होता. काळू पवार याची परिस्थिती हालाखीची होती, त्यात कोरोनाचा काळ असल्यामुळे हाताला काम मिळत नव्हते. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात काळू यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे मुलाचा अंत्यविधी करण्यासाठी काळू पवार यांच्याकडे पैसे नसल्यामुळे, त्याने गावातील सावकार रामदास कोरडे यांच्याकडून ५०० रुपये उसने घेऊन मुलावर अंत्यसंस्कार केले.

(हेही वाचाः सासरच्यांच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या)

सावकाराकडून छळ

पैशाची परतफेड करू शकत नसल्यामुळे काळू पवार हा रामदास कोरडे यांच्याकडे गेला आणि मी तुमचे ५०० रुपये कसे फेडू म्हणून विचारले असता, रामदास कोरडे याने त्याला गडी म्हणून कामावर ठेऊन घेतले. मागील दोन महिन्यांपासून ५०० रुपयांची परतफेड करण्यासाठी काळू कोरडे याच्या शेतावर, घरी गडी म्हणून राबत होता. त्या मोबदल्यात त्याला केवळ सकाळची एक वेळची भाकरी मिळत असे. काळू पवार काम करत असल्याची मजुरी रामदास कोरडे याच्याकडे मागू लागताच, अजून तुला दिलेले ५०० रुपये फिटले नाहीत आणि यापुढे पैसे मागितलेस तर जीव घेईन, असे बोलून शिवीगाळ करत होता, असे काळू पवार याची पत्नी सावित्री हिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी केला गुन्हा दाखल

माझे पती काळू पवार यांनी रामदास कोरडे यांच्याकडून घेतलेले पाचशे रुपये काम करुनही फिटत नाहीत. तसेच त्यांना गडी म्हणून कामावर ठेऊन कामाचा मोबदला मिळत नसल्यामुळे, कोरडे यांच्या धमकीला कंटाळून आत्महत्या केल्याचे सावित्री हिने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मोखाडा पोलिसांनी रामदास कोरडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी संगीतले.

(हेही वाचाः मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या ‘त्या’ शेतकऱ्याचा अखेर मृत्यू!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.