मुलांना भूक लागल्यामुळे त्यांनी वडिलांकडे जेवण मागितले होते. मात्र, जेवण देऊ न शकल्याने हतबल झालेल्या पित्याने आपल्या तिन्ही मुलांना आईस्क्रीम मधून उंदीर मारण्याचे औषध दिल्याचा धक्कादायक प्रकार मानखुर्द येथे घडला. यामध्ये ५ वर्षाच्या अपंग मुलाचा मृत्यू झाला असून, सात आणि अडीच वर्षांच्या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पळून गेलेल्या पित्यावर मानखुर्द पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, त्याचा कसून शोध सुरू आहे.
कामधंदा नसल्यामुळे कुटुंब जेरीस
आलिशान मोहम्मद अन्सारी (५) असे या विषप्रयोगात मृत्यू झालेल्या अपंग मुलाचे नाव असून अलिना (७) आणि अरमान (अडीच वर्षे) या दोघांवर उपचार सुरू आहेत. नाजीया आणि मोहम्मद अन्सारी या दाम्पत्याची ही तिन्ही मुले. मानखुर्द परिसरातील साठे नगर येथे राहणाऱ्या या दाम्पत्यामध्ये मागील काही महिन्यांपासून घरखर्चावरुन वाद सुरू होते. लॉकडाऊनमुळे कामधंदा नसल्यामुळे हे दाम्पत्य जेरीस आले होते. पतीने काही तरी कामधंदा करावा आणि घरात पैसे आणून द्यावेत, म्हणून नाजीया पतीला सतत बोलत होती. मोहम्मद अन्सारी देखील कामासाठी बाहेर पडत असे, मात्र काम मिळत नसल्यामुळे मोहम्मद रिकाम्या हाताने घरी परत येई.
(हेही वाचाः ‘त्या’ रेव्ह पार्टी प्रकरणात आता बंगल्याच्या मालकाला अटक)
काय घडले त्यादिवशी?
मंगळवारी पती-पत्नीत या कारणावरुन पुन्हा वाद झाला, या वादातून संतापलेल्या मोहम्मद अन्सारी याने पत्नीला मारहाण करुन घरातील वस्तू पेटवून दिल्या होत्या. घरात स्वयंपाक बनला नसल्यामुळे तिन्ही मुले उपाशी होती. त्यांनी रात्री वडिलांकडे जेवण मागितले असता, मोहम्मद याने तिन्ही मुलांना आईस्क्रीम मधून उंदीर मारण्याचे औषध दिले. तिन्ही मुलांनी आईस्क्रीम खाल्लं मात्र दोघांना चव आवडली नाही, म्हणून दोघांनी ते फेकून दिलं. मात्र, अपंग असलेल्या ५ वर्षांच्या आलिशान याने आईस्क्रीम खाल्यानंतर त्याला उलट्या होऊ लागल्या. या प्रकारानंतर वडील मोहम्मद याने तेथून पोबारा केला. आई नाजीयाने ताबडतोब तिन्ही मुलांना नजिकच्या मनपा रुग्णालयात दाखल केले असता, त्या ठिकाणी उपचारादरम्यान आलिशान याचा मृत्यू झाला. इतर दोघांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
(हेही वाचाः जेव्हा ‘बाप’ होतो ‘सैतान’, तेव्हा…)
याप्रकरणी आई नाजीया हिने पतीच्या विरुद्ध मानखुर्द पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन, मोहम्मदचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community