५० रुपये चोरले म्हणून बापाने स्वत:च्या मुलाचा घेतला जीव

घरातून ५० रुपयांची चोरी केली म्हणून एका पित्याने १० वर्षांच्या स्वतःच्या मुलाला मरेपर्यंत मारहाण करून मृतदेह चादरीत गुंडाळून घरातच लपवून ठेवल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसर हादरला असून कळवा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पित्याला मुलाच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे.

डोक्यात लाकडाच्या दांडक्याने मारले

संदीप उर्फ बबलू ओमप्रकाश प्रजापती असे अटक केलेल्या पित्याचे नाव आहे, तो पत्नी आणि दोन मुलांसह कळवा वाघोबानगर, ठाकुरपाडा येथे राहत आहे. १० वर्षांचा मुलगा करण याने बुधवारी दुपारी घरातून ५० रुपयांची चोरी केली होती. मुलाने घरातून पैसे चोरल्याचे समजताच संतापलेल्या पित्याने करण याला त्याच रात्री बेदम मारहाण केली. करणच्या डोक्यात लाकडाच्या दांडक्याने मारल्यामुळे डोक्यात इजा होऊन करण जागेवर निपचित पडला.

(हेही वाचा मुंबईकरांच्या उत्साहावर विरजण! निर्बंधांचे दिवस वाढवले)

१२ तासाहून अधिक काळ मुलगा घरात बेशुद्ध

त्यानंतर पिता संदीप याने करणला त्याच अवस्थेत चादरीत गुंडाळून दार बंद करून घेतले होते. रात्री घडलेला प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी कळवा पोलिसांना कळवले. १२ तासाहून अधिक काळ मुलगा घरात बेशुद्ध अवस्थेत बंद असल्याची खबर मिळताच कळवा पोलिसांनी गुरुवारी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घराचा दरवाजा उघडून पाहणी केली असता घरात दहा वर्षीय मुलाला एका चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत मिळाला. पोलिसांनी करणला कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्या मुलाला मृत घोषित केले. मयत मुलाच्या अंगावर जबर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या असून या मारहाणीत मयताच्या डोक्याची कवटी देखील फुटल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच पोलिसांनी करणच्या बहिणीकडे चौकशी केली असता, भावाने घरातून ५० रुपये चोरले होते, त्यावरून वडिलांनी त्याला मारहाण केल्याचे सांगितले. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल पित्याला मुलाच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here