माहेरी गेलेली पत्नी घरी परत येत नाही, म्हणून या पठ्ठ्याने पत्नीला परत बोलावण्यासाठी जिवंतपणीच स्वतःच्या मुलाच्या अंत्ययात्रेचे, तर मुलीला फासावर लटकवल्याचे नाटक करुन त्यांची छायाचित्रे पत्नीच्या मोबाईलवर पाठवली. दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे, त्यांना शेवटचे बघण्यासाठी तरी घरी ये असा मेसेज त्याने बायकोला पाठवला. मात्र खरा प्रकार समोर आल्यानंतर पत्नीने पोलिसांत पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. मुंबई पश्चिम उपनगरातील मालाड पूर्व येथील या घटनेप्रकरणी कुरार पोलिसांनी मुलांना ताब्यात घेतले आणि पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
बायको घरी येईना
मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज येथे राहणारा ३३ वर्षांचा हा पिता एका प्रिंटिंग प्रेस मध्ये नोकरीला आहे. पत्नी आणि दोन लहान मुलांसोबत राहणाऱ्या या इसमाला दारुचे भयंकर व्यसन आहे. दारुच्या व्यसनात तो पत्नी आणि मुलांना मारहाण करत असल्यामुळे, दोन वर्षांपूर्वी पत्नी मुलांना घेऊन माहेरी उत्तर प्रदेश येथे निघून गेली. काही महिन्यांपूर्वी तो पत्नी आणि मुलांना घेण्यासाठी गावी गेला होता, मात्र पत्नीने सोबत येण्यास नकार दिल्यामुळे तो दोन्ही मुलांना घेऊन मुंबईत आला.
(हेही वाचाः 15 वर्षांच्या मुलीने आईचा दाबला गळा… कारण ऐकून धक्काच बसेल)
असे रचले मृत्यूनाट्य
महिन्याभरापासून तो पत्नीला सतत फोन करुन मुंबईत येण्यासाठी विनवणी करत होता. मात्र पत्नीने येण्यास नकार दिल्यामुळे पत्नीला मुंबईत कसे आणायचे, या विचारात असताना त्याने मुलांचा मृत्यू झाल्याचे नाटक करण्याचे ठरवले. पत्नीला खरे वाटावे म्हणून, त्याने तिरडी तयार करुन त्याच्यावर मुलाला झोपण्यास सांगितले. मुलाच्या गळ्यात हार घालून वरुन पांढरे कापड टाकून, त्यावर हळद कुंकू टाकून मुलाचे फोटो काढले. त्यानंतर त्याने मुलीच्या गळ्याला फास बांधून पंख्याला लटकवून तिचे फोटो पत्नीला पाठवले. तसेच मुलाचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. या अवस्थेत मुलाचे फोटो बघून या मातेने गावी हंबरडा फोडला आणि मालाड मध्ये राहणाऱ्या एका नातेवाईकाला फोन करुन कळवले. या नातेवाईकाने घरी जाऊन बघितले असता, मुले सुखरूप असल्याचे कळले.
बायकोला आला संताप
पतीने केलेल्या या कृत्यामुळे संतापलेल्या पत्नीने हा प्रकार दिराला सांगून तक्रार करण्यास सांगितले. दिराने भावाच्या विरोधात कुरार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसही या अवस्थेत मुलाचे फोटो बघून हादरले आणि तात्काळ गुन्हा दाखल करुन पित्याला अटक केली. पत्नी घरी येत नसल्यामुळे तिला घरी बोलावण्यासाठी हे नाटक केले होते, अशी कबुली त्याने दिली आहे.
(हेही वाचाः ३० वर्षांच्या सेवेनंतर पोलिस शिपाई होणार सब इन्स्पेक्टर)
Join Our WhatsApp Community