मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक वि.वि. करमरकर यांचे निधन

176

माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक वि. वि. करमरकर यांचे सोमवारी सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मराठी दैनिकात सर्वांत प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना मानाचे पान देणारे आणि म्हणूनच ”क्रीडा पानाचे जनक” अशी त्यांची विशेष ओळख होती.

वि.वि. करमरकर यांचे पूर्ण नाव विष्णू विश्वनाथ करमरकर. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १९३८ रोजी नाशिक येथे झाला. हे मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक समजले जातात. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्येच झाले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. झाले. त्यांचे वडील डॉ. वि.अ. करमरकर हे निष्णात डॉक्टर होते. आई सुशीलाताई यांनी करमरकरांना संस्कारित केले. करमरकर यांनी पत्रकारितेची सुरुवात नाशिकचे रसरंग साप्ताहिक आणि मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते एस.एम. जोशी चालवत असलेल्या दैनिक लोकमित्रमधून केली. जून १९६२ मध्ये करमरकर महाराष्ट्र टाइम्सच्या क्रीडा विभागाचे प्रमुख झाले. सहसंपादक (क्रीडा) या नात्याने ते महाराष्ट्र टाइम्समधील क्रीडा पानाचे संपादन करू लागले. त्यांची ही पत्रकारिता खेळाच्या बातम्या, क्रीडा समीक्षणे व स्तंभ लेखन यांविषयी मराठी माणसाची जिज्ञासा पुरी करू लागली. याचा परिणाम म्हणून सर्वच मराठी वृत्तपत्रांत हळूहळू क्रीडा पत्रकारांना मानाचे स्थान व हक्काचे पान उपलब्ध झाले.

( हेही वाचा: बाॅलिवूड महानायक अमिताभ बच्चन शुटिंगदरम्यान जखमी; उपचार सुरु )

मराठी दैनिकांमध्ये खेळांच्या बातम्यांना प्रमुख स्थान

१९६० च्या आधी मराठी दैनिकांमध्ये खेळांच्या बातम्यांना प्रमुख स्थान नव्हते. ते करमरकर यांनी मिळवून दिले. यासाठी एक पूर्ण पान तयार करून खेळांची आवड असणाऱ्या वाचकांची भूक त्यामधून त्यांनी पूर्ण केली. १९६२ मध्ये महाराष्ट्र टाइम्स सुरू झाल्यानंतर या दैनिकाच्या पहिल्या फळीत करमरकर यांचा सहभाग होता. द्वा.भ.कर्णिक संपादक असलेल्या या दैनिकात सुरुवातीला आधी दोन कॉलममध्ये क्रीडा जगताच्या बातम्या येत असत. इंग्रजी वर्तमानपत्रात खेळांच्या बातम्या मोठ्या संख्येने असत. मात्र, मराठीत फारशा बातम्या नसताना त्या आणून मराठी जगताला त्या वाचायला दिल्या पाहिजेत, यासाठी त्यांनी आपली लेखणी सतत प्रभावी आणि प्रवाहितपणे सुरु ठेवली. यासाठी त्यांना द्वा.भ.कर्णिक यांच्याप्रमाणे गोविंद तळवलकर या ज्येष्ठ संपादकांचा भक्कम पाठिंबा मिळाला. याशिवाय त्यांना आ.श्री. केतकर, वसंत भालेकर, चंद्रशेखर संत, सुहास फडके, प्रवीण टोकेकर, शरद कद्रेकर, संजय परब यांची तितकीच तोलामोलाची साथ मिळाली होती.

पारदर्शक कारभाराचा अट्टाहास

समाजवादी विचारांच्या जडणघडणीत तयार झालेल्या करमरकर यांनी आपल्या उभ्या आयुष्यात सतत पारदर्शक कारभाराचा अट्टाहास धरला. नकली आणि संवगतेच्या मागे न जाता जे पायाभूत असेल त्याची कास धरली पाहिजे, यावर त्यांचा कायम भर राहिला. त्यांच्या लिखाणामधून हेच सतत समोर येत राहिले. मुख्य म्हणजे क्रीडा संस्था, कार्यकर्ते आणि खेळाडू यांनी याच वाटेवरून पुढे जायला हवे, जे कायम टिकू शकेल, याचा त्यांनी सतत ध्यास घेतला.

कालानुरूप बदललेली लिखाण शैली

वर्तमानपत्रातून दैनंदिन क्रीडा समीक्षा लेखन करणारे करमरकर यांचे स्तंभ लेखन वाचकांना आवडू लागले. कालांतराने खेळाचे हौशी स्वरूप बदलत गेले आणि तो एक पैसे मिळविण्याचा उद्योग झाला. अनेक उद्योग समूह क्रीडा क्षेत्रात रस घेऊ लागले. अशांनी बांधलेली स्टेडियम्स, त्यांवरील अफाट खर्च आणि त्यासाठी होणारा भ्रष्टाचार यावर १९९३ पासून करमरकरांचे लिखाण प्रकाश टाकू लागले. सुरेश कलमाडी यांच्या खोट्या क्रीडा प्रेमावर ते सतत टीका करत. १९८२ मध्ये दिल्लीत आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी स्टेडियम बांधताना सुमारे शंभर मजूर मरण पावले, त्यांची नावेही समजली नाहीत. ’रक्तरंजित’ या मथळ्याखाली त्यांनी या मजुरांची हकीकत वाचकांना माहिती करून दिली.

भारतीय खेळाडूंचे मागासलेपण आणले समोर

भारतीय खेळाडू हे जगातील जमेका, क्युबासारख्या अगदी छोट्या छोट्या देशांतील खेळाडूंपेक्षा किती अधिक मागासलेले आहेत हे करमरकरांनी वाचकांच्या नजरेस आणले. जगातील अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक, क्रीडा वैद्यक तज्ज्ञ यांच्या जिवंत अनुभवांचे करमरकरांनी शब्दांकन करून प्रसिद्ध केले.

महाराष्ट्र क्रीडा विकास संस्थेची निर्मिती

देशी व ऑलिंपिक खेळाच्या प्रचार-प्रसार आणि विकासासाठी त्यांनी पदरमोड करून कोकणात खेड्यापाड्यांत भटकंती केली. खेळांच्या स्पर्धाचे आयोजन एवढाच उद्देश न ठेवता खेळाडूंची बौद्धिक, मानसिक व शारीरिक जडणघडण व्हावी, त्यागी-निष्ठावान खेळाडू घडावेत, याचा अखंड ध्यास घेऊन महाराष्ट्र क्रीडा विकास संस्थेची त्यांनी निर्मिती केली. त्या संस्थेमार्फत ते सतत दहा वर्षे रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांत देशी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करीत राहिले. सेवा निवृत्तीनंतरही त्यांनी हा वसा अविरत चालू ठेवला.

धावत्या समालोचनाने मराठी समिक्षेतील उणीव केली दूर

खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ यांच्या सहभागाशिवाय खेळाचे पान कसदार होणार नाही. याची जाणीव करमरकरांना पहिल्यापासून होती. कितीतरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, संघटक, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ यांच्या जिवंत अनुभवाचे त्यांनी शब्दांकन स्वतः केले. याचप्रमाणे सहकाऱ्यांमार्फत करून घेतले. बड्या क्रीडा स्पर्धांदरम्यान, विशेष पुरवण्यांनी क्रीडा पान सतत सजवले. आकाशवाणी, दूरदर्शन, विविध टी.व्ही. वाहिन्यांवरील करमरकर यांनी केलेली सामन्यांची धावती समालोचने व समिक्षणे खूप गाजली. क्रिकेटप्रमाणे कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस आदी खेळांच्या मराठीतील धावत्या समालोचनाने मराठी समिक्षेतील उणीव समर्थपणे दूर केली. निवृत्तीनंतर लोकसत्तासह इतर अनेक वृत्तपत्रांत त्यांनी लेखमाला लिहिल्या.

अनेक सोपे सुटसुटीत शब्दांची केली निर्मिती

चौकार, षटकार, धावफलक, झटपट क्रिकेट, चौफेर फटकेबाजी, टे टे दापाझो, राकेफ असे अनेक सोपे सुटसुटीत शब्द याची निर्मिती त्यांनी केली. मराठी भाषा ओघवती आणि प्रभावी करायची असेल तर ती आधी सोपी असली पाहिजे, याचा त्यांनी कायम अट्टाहास धरला. परिणामी त्यांच्या बातम्या आणि लेख माहितीसह खूप परिणामकारक ठरले. आपल्या धावत्या समालोचनात सोप्या आणि आपण निर्मित केलेल्या शब्दांची पेरणी ते अचूक करीत असत. यामुळे श्रोत्यांना अधिक तपशीलपूर्ण माहिती मिळत असे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.