विनापरवाना गर्भपाताच्या गोळ्या ऑनलाइन विकल्याने अन्न व औषध प्रशासनाने ॲमेझॉन या ऑनलाइन विक्री पोर्टल विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गर्भपाताच्या गोळ्या विकण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक असताना केवळ ऑनलाइन ऑर्डरच्या माध्यमातून या गोळ्या सहज उपलब्ध होत असल्याने अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली. येत्या दोन दिवसांत गर्भपाताच्या गोळ्या विनापरवाना विकणाऱ्या अजून एका ऑनलाइन पोर्टलवर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.
ऑनलाइन माध्यमातून गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री
महिलांच्या शरीरात गर्भपाताच्या गोळ्या डॉक्टरांच्या परवानगी शिवाय जाणे हे कित्येकदा धोकादायक ठरते. गोळ्यांचे प्रमाण राखले गेले नाही तर महिलांच्या जिवावरही बेतते. त्यामुळे गर्भपाताच्या गोळ्या या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देता येत नाहीत. अशातच राज्यातील विविध भागांतून ॲमेझॉनवर सर्च करताना ‘सेफ्टी अबोर्शन किट’ असे टाईप केले असता विविध औषध कंपन्यांच्या गोळ्या सहज उपलब्ध होत होत्या. अन्न व औषध प्रशासनाच्या पुण्याच्या शाखेने सहा महिन्यांपूर्वी हा प्रकार उघडकीस आणला होता. त्यावेळी औषध विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर ऑनलाइन माध्यमातून गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री होणार नाही, असे आश्वासन ॲमेझॉनने दिले होते.
काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई शाखेच्या अधिकाऱ्याने ॲमेझॉनवर पुन्हा गर्भपाताच्या गोळ्या विकल्या जात असल्याचे पाहिले. दरम्यानच्या काळात अन्न व औषध प्रशासनाला ॲमेझॉनविरोधात सतत तक्रारी मिळाल्या होत्या. त्यामुळे कारवाई केल्यानंतर ॲमेझॉनने गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री सुरुच ठेवली. अखेर वांद्रे येथील खेरवाडी पोलिस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाने ॲमेझॉन आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर औषध पुरवठा करणा-या औषध विक्रेत्याविरोधात भारतीय दंड संहिता १८६० आणि औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० आणि विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
Join Our WhatsApp Community