नाशिकमधून भेसळयुक्त पनीर जप्त

120

नाशिक जिल्ह्यातून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी १२ लाख रुपयांचे भेसळयुक्त पनीर, तूप, दूध पावडर आदी पदार्थ जप्त केले. बुधवारी २४ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी दोन दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणा-या दुकानांवर ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे नाशिक जिल्ह्यांतील भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांच्या दुकानांवर सातत्याने अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाया सुरु आहेत.

पहिली कारवाई

नाशिक जिल्ह्यात दूध, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई आणि खाद्यतेल आदींवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांकडून सतत कारवाया सुरु आहेत. एका कारवाईतूनच मधुर डेअरी एण्ड डेलीनिड्स या दुकानाबाबत अन्न व औषध विभागाच्या अधिका-यांना टीप मिळाली. बुधवारी अन्न व औषध प्रशासननाने या दुकानावर धाड टाकल्यानंतर आवश्यक परवाना कागदपत्रांची तपासणी केली. मात्र अधिका-यांना दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडून दिला जाणारा परवाना मधुर डेअरी एण्ड डेलीनिड्सकडे नसल्याचे आढळले. या दुकानात रिफाइंड मोबाईल तेलाचा वापर करुन पनीर बनवले जात होते. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी दुकानाचे मालक अप्पासाहेब घुले यांना आवश्यक परवाना घेतल्यानंतर व्यवसाय करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या दुकानातील भेसळयुक्त पनीर, अॅसीटीक अॅसिड, रिफाइंड पामोलीन तेल, तूप आदी २ लाख ३५ हजार ७९६ रुपयांचा माल जप्त केला. हा कारखाना अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी सील केला.

दुसरी कारवाई

त्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील मसरुळ येथील आनंद डेअरी फार्मला भेट दिली. दुकानाचे मालक आनंद वर्मा यांची अधिका-यांनी चौकशी केल्यानंतर डेअरीतील पनीर बनावट दूध पावडर आणि खाद्यतेलाचा वापर करुन बनवले जात असल्याची कबुली दिली. अधिका-यांनी तातडीने भेसळयुक्त पनीर, दूध पावडर, रिफाईंड पाम तेल आदी अन्नपदार्थांचा ९ लाख ६७ हजार ३१५ रुपयांचा साठा जप्त केला. हा कारखाना अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी सील केला.

कारवाईचे पथक 

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) उ. सी. लोहकरे यांच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्याचे सहआयुक्त ग. परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी पी. पाटील, अ. रासकर , डी. तांबोळी, अ. दाभाडे यांनी सहभाग नोंदवला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.