कोरोना काळातही देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक! गुजरातने मारली बाजी

ही भारताच्या औद्योगिक विकासाला चालना देणारी गोष्ट असल्याचे म्हटले जात आहे.

वर्षभरापेक्षाही अधिक काळ देशावर कोरोनाचे सावट आहे. गेल्या वर्षी देशात झालेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला फार मोठे नुकसान सहन करावे लागले. पण असे असले तरी देशात थेट परकीय गुंतवणुकी(एफडीआय)चे प्रमाण गेल्या आर्थिक वर्षात वाढल्याचे, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये सर्वात जास्त गुंतवणुकीत गुजरात राज्याची सरशी झाली असून, महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे.

इतकी आहे गुंतवणूक

लॉकडाऊनमुळे देशात मोठ्या प्रमाणावर व्यवसाय ठप्प झाले. त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्थेवर करण्यात आलेल्या खर्चामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. असे असले तरी 2020-21 या आर्थिक वर्षात देशातील एफडीआय गुंतवणुकीत मात्र वाढ झाली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात देशात एकूण 81.72 अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली आहे. यामध्ये 2019-2020 या आर्थिक वर्षापेक्षा 10 टक्क्यांनी वाढ झाल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच एफडीआय इक्विटी(भागभांडवल)ची आवक ही 19 टक्क्यांनी वाढल्याचेही सांगण्यात आले आहे.

या देशांची सर्वाधिक गुंतवणूक

या थेट परकीय गुंतवणुकीत सिंगापूरकडून सर्वाधिक गुंतवणूक भारतात झाली आहे. त्यापाठोपाठ अमेरिकेकडून 23 टक्के तर मॉरिशस कडून 9 टक्के गुंतवणुकीची नोंद झाली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत अमेरिकेची भारतातील एफडीआय इक्विटी दुप्पट आहे, तर ब्रिटनकडून 44 टक्क्यांची गुंतवणूक करण्यात आली आहे. भारतात गुंतवणूक करणा-या पहिल्या 10 देशांपैकी, सौदी अरेबिया देशाने 2020-21 या आर्थिक वर्षात गुंतवणुकीत लक्षणीय वाढ केल्याचे निदर्शनास आले आहे. या तेल निर्यातक देशाकडून गेल्या आर्थिक वर्षात 2.8 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भारतात करण्यात आली आहे. जी 2019-20 या आर्थिक वर्षात 90 दशलक्ष डॉलर इतकी होती.

गुजरातमध्ये सर्वाधिक गुंतवणूक

देशातील इतर सर्व राज्यांच्या तुलनेत गुजरात राज्यात सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. भारतातील एकूण गुंतवणुकीपैकी गुजरात राज्यात 37 टक्के परकीय इक्विटी गुंतवणूक करण्यात आली आहे. तर त्या पाठोपाठ महाराष्ट्राचा वाटा हा 27 टक्के इतका आहे. कर्नाटक राज्यात एकूण गुंतवणुकीच्या 13 टक्के इक्विटी गुंतवणुकीची नोंद झाली आहे. त्यामुळे भारतात एकूण 77 टक्के थेट परकीय गुंतवणुकीची नोंद झाली असून, उर्वरित देशात 23 टक्के परकीय भांडवलाची कमतरता असल्याचे दिसून येते.

या क्षेत्रांत झाली गुंतवणूक

2020-21 या आर्थिक वर्षात काँम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात एकूण परकीय गुंतवणुकीच्या सर्वाधिक 44 टक्के इतकी गुंतवणूक झाली आहे. तर पायाभूत सुविधांवर 13 टक्के आणि सेवा क्षेत्रावर 8 टक्के एफडीआय इक्विटी गुंतवणूक झाली आहे. गुजरातमधील एफडीआय गुंतवणुकीचा जवळपास 94 टक्के वाटा, हा सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्राकडे वळला असून, या क्षेत्राच्या एकूण गुंतवणुकीपैकी 78 टक्के राज्याचा वाटा आहे. तर कर्नाटक आणि दिल्ली राज्यांचा या क्षेत्रातील वाटा अनुक्रमे 9 टक्के आणि 5 टक्के इतका आहे.

औद्योगिक क्षेत्रासाठी समाधानकारक

2019-20 या आर्थिक वर्षात भारतात एकूण 74.39 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली होती. यामध्ये इक्विटी गुंतवणुकीचा वाटा 50 दशलक्ष डॉलर्स इतका होता. पायाभूत सुविधा, सॉफ्टवेअर व हार्डवेअर, रबराच्या वस्तू, औषधे आणि इलेक्ट्रिकल साधनांमध्ये 2020-21 या आर्थिक वर्षात सर्वाधिक गुंतवणूक झाल्याचे सांगण्यात आले आहे. ही भारताच्या औद्योगिक विकासाला चालना देणारी गोष्ट असल्याचे म्हटले जात आहे.

काय आहेत परकीय गुंतवणुकीचे फायदे?

  • एफडीआयमुळे देशाच्या निव्वळ गुंतवणुकीत वाढ होते.
  • ही गुंतवणूक थेट भौतिक संपत्तीमध्ये होत असल्याने विकासाला चालना मिळते.
  • गुंतवणूक करणा-या बहुराष्ट्रीय कंपन्या(Multi National Companies) देशात गुंतवणुकीसोबतच तंत्रज्ञान, बौद्धिक भांडवल, व्यवस्थापन कौशल्य आणतात. त्यामुळे मानवी व संस्थात्मक क्षमतांचा विकास होतो.
  • एफडीआयमुळे उत्पादन क्षमता वाढून, देशातील रोजगार वाढतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here