२३ फेब्रुवारी : Gadge Maharaj यांची जयंती; जाणून घ्या महाराजांचा जीवन परिचय

437
गाडगे महाराजांचं (Gadge Maharaj) पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असं होतं. त्यांच्या वडिलांचं नाव झिंगराजी राणोजी जानोरकर आणि आईचं नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर असं होतं. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी शेंडगावात झाला.
गाडगे महाराज (Gadge Maharaj) हे दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे समाजसुधारक होते. आपल्या कीर्तनातून ते लोकांचं प्रभोधन करायचे. आपल्या कीर्तनातून गाडगे महाराज समाजातला दांभिकपणा, रूढी-परंपरा यांच्यावर टीका करायचे. तसंच ते समाजाला शिक्षणाचं आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून द्यायचे.
समाजामध्ये पसरलेलं अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केलं. त्यासाठी त्यांनी कीर्तनाचा मार्गा अवलंबला होता. कीर्तनातुन ते श्रोत्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांना आपल्या अज्ञान, दुर्गुण आणि दोषांची जाणीव करून द्यायचे. ते खूप साधे आणि सोपे उपदेश करायचे. जसं की, चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असं ते आपल्या कीर्तनातून लोकांना सांगत असत.
गाडगे महाराजांचा (Gadge Maharaj) जन्म अमरावती जिल्ह्यातल्या शेंडगाव नावाच्या गावात झाला. त्यांचं बालपण त्यांच्या आईच्या माहेरी म्हणजेच मूर्तिजापूर तालुक्यातल्या दापुरे नावाच्या गावामध्ये गेलं. त्यांच्या मामांची खूप मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच डेबूजीला शेतीत रस होता. विशेषतः गुरांची निगराणी करायला खूप आवडायचं.
डेबूजी लहान असतानाच त्यांचे वडील दारूच्या व्यसनामुळे दगावले. त्यांच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे लहानपणापासूनच डेबूने गुरं राखणं, नांगर चालवणं, शेतीवाडी करणं अशी कामं ते करायचे. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचं लग्न लहानपणीच झालं होतं. त्यांना चार मुली झाल्या. पण ते संसारात रमले नाहीत. घरदार सोडून ते लोकांचा संसार सुधारण्यासाठी घराबाहेर पडले.
गावात कोणाचं काही अडलं असेल, कुठेही काही काम करायचं असेल तर गाडगे महाराज (Gadge Maharaj) स्वतःहून पुढाकार घेऊन काम करत असत. १ फेब्रुवारी १९०५ साली त्यांनी संन्यास स्वीकारला आणि तीर्थाटन केलं, अनेक ठिकाणी भ्रमण केलं. तीर्थाटन करतानाही त्यांनी लोकसेवेचं व्रत सोडलं नाही. कोठे कोणी अडचणीत असेल तर ते त्यांच्या मदतीला धावायचे.
त्यांच्याजवळ सतत एक खराटा असायचा. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक मडक्याचं फुटकं गाडगं असायचं. त्यामुळे लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणायचे. ते ज्या गावात जायचे ते गाव झाडून स्वच्छ करायचे. दिवसा ते गावात झाडू मारायचे आणि संध्याकाळी कीर्तन करायचे. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वं समाजात रुजवण्यासाठी त्यांनी स्वतः सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले. गाडगे महाराज (Gadge Maharaj) संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानायचे. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा प्रामुख्याने वर्‍हाडी बोलीचा वापर करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या अभंगांचा वापरही वेळोवेळी केला होता. ‘आस्तिक माणसापासून ते नास्तिकापर्यंत सगळ्या वयोगटातल्या लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत असत.
महाराष्ट्रातल्या संत परंपरेविषयी असं म्हटलं जातं की, ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस.’ गाडगे महाराजांच्या समाजकार्यामुळे  ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ असं म्हटलं जातं. आचार्य अत्रे यांनी गाडगे महाराजांना ‘महाराष्ट्रातल्या समाजवादाचं प्रचंड व्यासपीठ’, असं म्हटलं आहे.
लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासामध्येच अमरावतीच्या जवळ असलेल्या वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ साली त्यांनी देह ठेवला. कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे बांधलेली आहे. अमरावती विद्यापीठाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असं नाव दिलं आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.