दहावी, बारावीच्या परीक्षेत सवलतीच्या गुणांचा लाभ मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांकडून यंदाच्या म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेपासून शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या, तसेच लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या आणि क्रीडा, एनसीसी, स्काऊट व गाईड प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण मिळविण्यासाठी पैसे भरून प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व विभागीय शिक्षण सचिवांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. यंदाच्या परीक्षेपासून प्रति विद्यार्थी ५० रुपये छाननी शुल्क म्हणून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्रस्ताव सादर करत असतानाच चलनाद्वारे किंवा रोख रुपये भरून विभागीय मंडळ स्तरावर प्रस्ताव स्वीकारण्यात यावेत असे सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा – ITR भरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आयकर विभागाने सुरू केली ‘ही’ सुविधा)
शिक्षण मंडळाच्या या शिफारशीला परीक्षा समितीनेदेखील मंजुरी दिली आहे. परीक्षेच्या प्रस्तावासोबतच हे छाननी शुल्क स्वीकारावे. छाननी शुल्क न आकारता किंवा कमी शुल्क आकारून प्रस्ताव स्वीकारण्यात येऊ नये, असे राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. या नव्या सूचनेमुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे काम वाढले आहे. दहावी, बारावीचे परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आता शाळांना नव्याने सवलतीच्या गुणांच्या प्रस्तावांसाठी छाननी शुल्क आकारावे लागणार आहे.
…म्हणून पैसे घेणार
शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या तसेच लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या आणि क्रीडा, एनसीसी, स्काऊट व गाईड प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सवलतीच्या अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव शाळा तसेच शिक्षणाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत विभागीय शिक्षण मंडळाकडे येत असतात. या सर्व प्रस्तावांची छाननी करावी लागते. त्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधितांशी पत्रव्यवहार करून त्रुटींची पूर्तता करावी लागते. त्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर रोजंदारी कर्मचारी नेमावे लागतात. या कामासाठी लागणारा वेळ, श्रम यांचा विचार करून छाननी शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे.
Join Our WhatsApp Community