सूडाने पेटलेल्या महिला पोलिसाने असा रचना खूनाचा कट

या प्रकरणी पनवेल पोलिसांनी महिला पोलिस शिपायासह तिघांना या हत्येप्रकरणी अटक केली आहे.

इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्रासोबत घाईघाईने लग्न करुन दुसऱ्याच दिवशी एकाची हत्या करण्यासाठी पतीकडे हट्ट केला. तिचा हा हट्ट ऐकून त्याला धक्काच बसला आणि त्याने तिच्यासोबतचे सर्व संबंध तोडून निघून गेला. मात्र, आपला मनसुबा पूर्ण करण्यासाठी तिने आपल्याच इमारतीच्या वॉचमनच्या मुलाची आणि त्याच्या मित्राची मदत घेऊन मुंबई पोलिस दलातील पोलिस हवालदाराची हत्या घडवून आणली. हा धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी पनवेल पोलिसांनी महिला पोलिस शिपायासह तिघांना या हत्येप्रकरणी अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड घडवून आणले असल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली.

(हेही वाचाः एकाच नव-यासाठी दोघींनी केला ‘टॉस’, कोण ठरलं ‘बॉस’ आणि कोणाचा झाला ‘लॉस’?)

काय आहे प्रकरण?

शीतल पानसरे(२९), गणेश चव्हाण(२१) आणि विशाल जाधव(१८) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. नवी मुंबईतील उलवे या ठिकाणी हे तिघे राहत आहेत. शीतल पानसरे ही महिला पोलिस शिपाई असून मुंबई पोलिस दलाच्या सशस्त्र विभागात कार्यरत होती. शीतल पानसरे ही यापूर्वी नेहरू नगर पोलिस ठाण्यात होती. त्याच पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार असणारे शिवाजी सानप(५४) हे पनवेल येथे कुटुंबियांसह राहत होते. १५ ऑगस्ट रोजी रात्री पनवेल रेल्वे स्थानक ते मालधक्का रोड दरम्यान शिवाजी सानप यांचा एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याच्या संशय सानप यांच्या पत्नीने व्यक्त केला होता. पनवेल पोलिसांनी घातपाताच्या संशयावरुन तपास करुन तांत्रिक पुराव्यावरुन गणेश चव्हाण, विशाल जाधव आणि महिला पोलिस शिपाई शीतल पानसरे या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.

(हेही वाचाः लॉकडाऊनमध्ये बियर-बार सुरू ठेवण्यासाठी असे होते वाझेचे ‘रेटकार्ड’)

रचला हत्येचा कट

शीतल पानसरे आणि शिवाजी सानप यांच्यात मागील दोन वर्षांपासून वैर होते. शीतल पानसरे हिने अनेक ठिकाणी सानप यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते. मात्र शिवाजी सानप यांना शिक्षा होत नव्हती, उलट शीतलची नेहरू नगर पोलिस ठाण्यातून सशस्त्र विभागात बदली झाली. ही बदली म्हणजे एक प्रकारची शिक्षा असल्यामुळे शीतल सुडाने पेटली. सूड घेण्यासाठी शीतलने इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एकासोबत मैत्री केली, त्यानंतर तिने त्याला लग्नासाठी तयार केले आणि चार दिवसांत दोघांनी नाशिकच्या मंदिरात विवाह केला. विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी तिने पतीकडे शिवाजी सानपची हत्या करण्यासाठी हट्ट केला. पत्नीचा हट्ट ऐकून धक्का बसलेल्या पतीने तिला नकार देत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तिच्यासोबतचे संबंध तोडून टाकले. मात्र, सूडाने पेटलेल्या शीतलने या कामासाठी तिच्या इमारतीतील वॉचमनचा मुलगा विशाल जाधव याला आपल्या जाळ्यात अडकवून त्याला पैशांची लालूच दाखवली आणि शिवाजीच्या हत्येची योजना तयार केली.

(हेही वाचाः 10 महिन्यांच्या चिमुकल्याला पळवले आणि…)

अपघातातून खुनाची उकल

विशालने त्याचा मित्र गणेश चव्हाण याला पैशांचे आमिष दाखवून त्याला देखील या कटात सामील करुन घेतले. योजनेनुसार शितलने एक जुनी नॅनो कार विशालला दिली. १५ ऑगस्ट रोजी दुपारीच विशालने नॅनो कार पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेर उभी करुन, गणेशसोबत ट्रेनने कुर्ला स्थानक गाठले, त्यानंतर हे दोघे शिवाजीच्या मागावर होते. शिवाजी सानप नेहरू नगर पोलिस ठाण्यातून रात्री आठ वाजता निघाले असता, या दोघांनी कुर्ला रेल्वे स्थानकापासून पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत सानपचा पाठलाग केला. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शिवाजी सानप पनवेल रेल्वे स्थानकातून घरी जाण्यासाठी पायी चालत जात असताना, विशाल आणि गणेश या दोघांनी पनवेल स्थानकाबाहेर पार्क केलेली नॅनो कार काढून पायी निघालेल्या शिवाजी सानप यांच्या अंगावर गाडी चढवून पळ काढला. त्यानंतर एका निर्जन ठिकाणी नॅनो आणून तिच्यावर पेट्रोल टाकून कार जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी धक्कादायक माहिती या तिघांच्या चौकशीत समोर आली. याप्रकरणी पनवेल पोलिसांनी अपघातातून खुनाची उकल करुन या तिघांना अटक केली.

(हेही वाचाः हॉटेलातील डीलक्स रूममध्ये ‘तो’ ८ महिने राहिला, बिल मागितले आणि…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here