ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी अर्जासोबत बोगस कागदपत्र जोडल्याचे आढळून आल्याने ठाणे जिल्ह्यातील 137-भिवंडी पूर्व आणि 151-बेलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रभारी निवडणूक नायब तहसिलदार यांनी संबंधितांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये 6 जणांविरुध्द तर बेलापूर विधानसभा मतदारसंघात 22 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली आहे.
28 जणांविरुध्द गुन्हा दाखल
1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या ऑनलाईन अर्जांसोबत बनावट कागदपत्रे जोडल्याचे निर्दशनास आल्याने 137-भिवंडी पूर्व मतदारसंघाचे प्रभारी नायब तहसिलदार विठ्ठल गोसावी यांनी भिवंडीच्या शांतीनगर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अशाच प्रकारे सीबीडी बेलापूर येथील पोलीस ठाण्यात 22 जणांविरुध्द 151-बेलापूर मतदारसंघाचे प्रभारी नायब तहसिलदार राजश्री पेडणेकर यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा- महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ‘या’ दोन्ही जागांवर ‘कमळ’ फुललं!)
ही कागदपत्र सादर करणं आवश्यक
मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी नमुना 6 द्वारे अर्ज करता येतो. त्यासाठी अर्जदाराला त्याचा रहिवासी पुरावा म्हणून वीजदेयक, पाणीपट्टी देयक, आधारकार्ड पॅनकार्डसह विविध कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. नवीन मतदार नोंदणीकरता राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतात.
Join Our WhatsApp Community