अंमलबजावणी संचलनालय (ईडी) विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून शेल कंपन्यांकडून पैसे उकळल्या प्रकरणी जितेंद्र नवलानी यांच्याविरुद्ध राज्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नवलानी यांनी २०१५ ते २०२१ या कालावधीत ५८ कोटी ९६ लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे.
( हेही वाचा : एका वर्षांत मध्य रेल्वेच्या टिसींनी वसूल केला २१४ कोटींचा दंड! )
तक्रार अर्ज दाखल
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र नवलानी नावाची व्यक्ती ईडीच्या अधिकाऱ्यांच्या नावाखाली विविध कंपन्यांकडून खंडण्या वसूल करीत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसैनिक असलेले अरविंद भोसले यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे जितेंद्र नवलानी यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता.
हे प्रकरण राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपविण्यात आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्राथमिक चौकशीमध्ये जितेंद्र नवलानी आणि इतरांनी अंमलबजावणी संचलनालय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून काम करण्याच्या मोबदल्यात विविध खाजगी कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये स्वीकारले होते. २०१५ ते २०२१ या कालावधीमध्ये ५८कोटी ९६लाख ४६हजार रुपये नवलानी यांनी स्वीकारल्याचे प्राथमिक तपासात समोर येताच गुरुवारी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने जितेंद्र नवलानी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या म्हण्यानुसार जितेंद्र नवलानी यांनी त्यांच्या नियंत्रणात असलेल्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून या रकमा प्राप्त केल्या आहेत.
Join Our WhatsApp Community