मुंबईत सध्या पोलिस दलातील वसुली गॅंगचा बोलबाला असून, गुरुवारी वसुली गँगचा पार्ट-३ समोर आला आहे. अंधेरीच्या आंबोली पोलिस ठाण्यात पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकारी यांच्यासह दोन पोलिस निरीक्षकांविरुद्ध खंडणीसह गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत सचिन वाझे यांच्यानंतर वसुली गॅंग पार्ट-२ मध्ये पोलिस उपायुक्त, एसीपी आणि पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिका-यांवर मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
याआधीही गुन्हे दाखल
अंटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांडानंतर तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची तत्कालीन गृहमंत्री यांनी उचलबांगडी केल्यानंतर, परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या कथित वसुलीचा लेटरबॉम्ब फोडल्यानंतर राज्याच्या राजकारणात आणि पोलिस दलात खळबळ उडवून दिली होती. या आरोपानंतर हा सिलसिला पुढे सुरुच राहिला आणि ठाण्यातील एका बांधकाम व्यवसायिकाने मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात परमबीर सिंग यांच्यासह पोलिस उपायुक्त, एसीपी, आणि पोलिस निरीक्षकांसह अनेकांविरुद्ध खंडणीची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी गठीत करण्यात आली होती. त्यानंतर हा गुन्हा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला.
(हेही वाचाः आळशी पोलिस एफआयआर ऐवजी तक्रारदाराला देतात प्रमाणपत्र)
१७ लाख उकळल्याचा आरोप
परमबीर सिंग आणि ठाण्यातील काही अधिकाऱ्यांविरुद्ध ठाणे पोलिसांत देखील दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. अंधेरी पश्चिम येथील आंबोली पोलिस ठाण्यात गुरुवारी नवीन खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील तक्रारदार प्रॉपर्टी डीलर असून त्याने पोलिस उपायुक्त आणि दोन पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या अधिकाऱ्यांनी आपली फसवणूक आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून खबऱ्यांमार्फत १७ लाख रुपये उकळल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.
तक्रारदाराच्या विरोधात गुन्हा
पैसे देऊनही पोलिस अधिकारी वारंवार पैशांची मागणी करत होते. त्यांना पैसे न दिल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला होता, असेही तक्रारदार याने म्हटले आहे. त्यानंतर हा गुन्हा पुढील तपासासाठी गुन्हे शाखा कक्ष-१० कडे वर्ग करण्यात आला होता, एवढ्यावर न थांबता तक्रारदाराला मारहाण करुन कोऱ्या कागदावर त्याची स्वाक्षरी घेण्यात आली होती, असेही त्याने तक्रारीत म्हटले आहे.
(हेही वाचाः दांडी बहाद्दर पोलिसांसाठी आयुक्तांचा ‘हा’ मोठा निर्णय!)
आंबोली पोलिस ठाण्यात पोलिस उपायुक्त आणि दोन पोलिस निरीक्षकाविरुद्ध खंडणीसह कट रचणे, मारहाण करणे, खोटे दस्तऐवज तयार करणे या संबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील पोलिस उपायुक्तांवर हा दुसरा गुन्हा असून यातील पोलिस निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी बडतर्फ असून, एनआयएच्या एका गुन्ह्यात तो तुरुंगात आहे. तर दुसरे पोलिस निरीक्षक मुंबईतील एका पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.
Join Our WhatsApp Community