अलिकडे चित्रपट, नाटक किंवा अन्य प्रकारच्या सादरीकरणांमधून हिंदू देवतांची विडंबना, टिंगल टवाळी करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. हे अतिशय चुकीचे आहे. कारण बहुतांश निर्माते-दिग्दर्शक विडंबनेसाठी फक्त हिंदू देवतांचाच वापर करतात, इतर धर्मांबाबत त्यांचा हात अखडता दिसून येतो.
देवी-देवतांच्या नावाने जेव्हा अंधश्रद्धेचा अतिरेक होतो, तेव्हा त्यावर ओरखडे मारलेच पाहिजेत. सिनेमा आणि नाटक हे त्याच्यावरचे सशक्त माध्यम आहे. पण असे ओरखडे मारताना कधीकधी पाय घसरतो आणि आपण काहीतरी जास्तच बोलून किंवा दाखवून जातो. त्याचे भान निर्माते, दिग्दर्शकांनी ठेवले पाहिजे. विडंबनेलाही एक मर्यादा असली पाहिजे. त्यातून कोणाच्याही भावना दुखावल्या जाता कामा नयेत.
उदाहरणादाखल मी परेश रावल आणि अक्षय कुमार यांच्या ‘ओ माय गॉड’ या सिनेमाचे नाव घेईन. हा सिनेमा पाहिल्यानंतर मला किंवा कुठल्याच प्रेक्षकाला वाईट वाटले नाही. कारण त्यातून एक वेगळा विचार मांडला गेला होता. श्रीकृष्ण म्हणाला होता, की मी प्रत्येक काळामध्ये जन्माला येईन. या चित्रपटात श्रीकृष्ण आधुनिक काळामध्ये दाखवला आहे. तो नकळतपणे नायकाला मदतही करीत असतो. ही एकंदरीत संकल्पना चांगली असल्यामुळे ना कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या, ना टिंगल झाली. याऊलट या सिनेमाने प्रेक्षकांचे प्रबोधनच केले.
यदाकदाचित या नाटकात हिंदू देवी-देवतांच्या नावाचा वापर केला होता. वस्रहरणसारखे अत्यंत गाजलेले नाटक असेल, त्यात सगळी महाभारतातील पात्रे साकारण्यात आली होती. पण त्यामुळे कोणाचे मन दुखावले गेले नाही. त्याची संकल्पना अतिशय खेळीमेळीची होती. हिंदू देवतांच्या नावाने अतिरेक झाला, कर्मकांडांचे अवडंबर माजवले गेले आणि त्यावर कोणी टीका-टिपण्णी केली, तर आम्ही हिंदू असूनही त्याचे स्वागतच करत आलेलो आहोत.
देवाच्या नावावर सुरू असलेल्या चुकीच्या प्रथा खपवल्या गेल्यास, त्यावर ताशेरे ओढलेच पाहिजेत. पण तितकीच हिम्मत इतर धर्माच्या बाबतीतही दाखवली पाहिजे. नेमके इतर धर्माच्या बाबतीत असे धाडस दाखवताना निर्माते, दिग्दर्शकांचा हात आखडला जातो, त्यांना भीती वाटायला लागते. मी फारच पुरोगामी आहे, हे दाखवण्याच्या नादात कधीकधी जास्तच वहावत जात चित्रण केले जाते. त्याला माझा विरोध आहे. मग तशीच हिम्मत इतर धर्मांबद्दलही दाखवा.
माझ्यासमोर कोंबडे मारा, असे देवीने कधी सांगितले नव्हते. त्याप्रमाणे मला बकऱ्याचा बळी हवा म्हणून अल्लानेही कधी सांगितले नाही. तेही तुम्ही सिनेमा-नाटकांमधून दाखवा. तिथे मात्र यांचे हात थांबतात, तोंडे बंद होतात. पुरोगामित्व सगळीकडे एकसमान हवे. सेन्सॉर बोर्डनेही उपरोक्त बाबींचा सारासार विचार करून सेन्सॉर प्रमाणपत्र दिले पाहिजे. ते देताना त्यांनी भेदभाव करता कामा नये. सेन्सॉर बोर्डावरच्या सदस्यांनी त्यांचे व्यक्तिगत विचार बाजूला ठेवून नियमानुसार परीक्षण करून प्रमाणपत्र दिले पाहिजे.
शरद पोंक्षे (लेखक ज्येष्ठ अभिनेते आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते आहेत. )
Join Our WhatsApp Community