आता पुरामुळे राज्याची तिजोरीही वाहणार

पूर संकटामुळे राज्य सरकारची चिंता वाढलेली असताना याचा भार आता राज्याच्या तिजोरीवर देखील पडणार आहे.

124

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे राज्य सरकारने काही कडक निर्बंध आखले असून, याचा फटका आता राज्याच्या तिजोरीला बसला आहे. आधीच राज्यावर कर्जाचा डोंगर असताना, आता तिजोरीवर आणखी भार पडणार आहे. राज्यावर आलेल्या पूर संकटामुळे राज्य सरकारची चिंता वाढलेली असताना याचा भार आता राज्याच्या तिजोरीवर देखील पडणार आहे.

पुराने वाढवली चिंता

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला असून, पूरपरिस्थिमुळे जवळपास ४ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन, कृषी, सार्वजनिक बांधकाम इत्यादी विभागांकडून हा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला आहे. रायगड, चिपळूण, महाड, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना जवळपास ४ हजार कोटींचा फटका बसल्याचे या अहवालात म्हटले आहे.

(हेही वाचाः ‘हे’ झाले असते, तर राज्यात आलेल्या आपत्तीतून अनेक निष्पाप जीव वाचले असते)

असे आहे नुकसान

लोकांची घरं, सार्वजनिक रस्ते, पूल, विद्युत पुरवठा, शेती आणि शासकीय इमारती यांचे पुरामुळे मोठे नुकसान  झाले आहे. तर साधारणत: ३.३ लाख हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले असून, रस्ते, पूल, विद्युत पुरवठा इत्यादींमुळे जवळपास १२०० कोटींचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

कधी होणार मदतीची घोषणा?

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना प्रचलित राष्ट्रीय आपत्ती निवारण निकषांपेक्षा अधिक मदत दिली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत ही मदत जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी वरिष्ठ मंत्र्यांसोबत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. या वेळी प्रचलित निकषांपेक्षा अधिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. अजूनही काही भागांत पुराचे पाणी असल्याने पंचनामे झालेले नाहीत. प्राथमिक अहवालाच्या आधारे मदतीची घोषणा केली जाईल. राज्यात अतिवृष्टीमुळे घरे, रस्ते, शेती, दुकानांचे किती नुकसान झाले याचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार २०१९च्या शासन निर्णयानुसार सुमारे ६ ते ७ हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा मंत्रीमंडळ बैठकीनंतर करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः चिपळूणला उभे करण्यासाठी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय!)

अशी आहे जीवितहानी

राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीतील बळींची संख्या २०९ वर पोहोचली असून, अजूनही आठ जण बेपत्ता आहेत, तर ५२ लोक जखमी झाले आहेत. पाऊस आणि महापूराचा १ हजार ३५१ गावांना फटका बसला असून, सुमारे ४ लाख ३४ हजार लोकांचे स्थलांतर झाले आहे. २ लाख ५१ हजार लोकांची ३०८ निवारा केंद्रांत तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.