वीर सावरकरांचे आदर्शवत चरित्र बनवणारे आदर्श!

183

आज संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, खरेतर शेकडो, हजारो ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणाची आहुती दिल्यामुळे आज आपण स्वातंत्र्य अनुभवत आहोत. या स्वतंत्र भारताचा पहिला ध्वज निर्माण करणारे, स्वातंत्र्य सैनिकांचे स्फूर्तिस्थान बनलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख केल्याशिवाय भारताच्या स्वातंत्र्याची यशोगाथा अपुरीच आहे. वीर सावरकर यांनी आपल्यात स्वातंत्र्य चळवळीचे धगधगते अग्निकुंड पेटते ठेवण्यासाठी कोणाकोणाला आदर्श मानले होते हे समजून घेण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासारखा दुसरा योग नाही.

न कळत्या वयात वीर सावरकर यांनी वाचन करण्यास सुरुवात केली, त्यातच त्यांची पाठांतर शक्ती सुद्धा दांडगी होती. घरी पुणे-मुंबईमधून येणाऱ्या केसरी, गुराखी, पुणे वैभव, जगद् हितेच्छु अशा वृत्तपत्रांचे ते नियमित वाचन करत असत. इतकेच नव्हे तर वाचन करता करता ते महत्त्वाच्या विषयांचे टाचण सुद्धा करत असत. या सर्व टाचण वहीला त्यांनी ‘सर्व सारसंग्रह’ असे नाव दिले होते. मध्येच त्यांना असे वाटले की, महाकाव्य लिहावे आणि मग देवांच्या भक्तांचे विजयाचे वर्णन लिहावे. ‘दुर्गादास विजय’ महाकाव्य लिहिण्याचा त्यांचा विचार बळावला होता, इलियड या इंग्रजी महाकाव्याचा त्यांनी अनुवाद अभ्यासला होता.

(हेही वाचा वीर सावरकरांच्या छायाचित्राला विरोध; SDPI च्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल)

महाकाव्य लिहायला बसल्यावर त्यांना आपले अक्षर फारसे चांगले नाही, असे आढळून आल्यावर त्यांनी आधी हस्ताक्षर सुधारण्याचे ठरवले. पण ते महाकाव्य लिहिण्याचा बेत मागे पडला आणि ते बारगळलेच! पण हाती येईल ते वाचण्याच्या नादात जुन्या माडीवर सापडलेली अरण्यकं सुद्धा ते वाचायला लागले, इतर जी काही पुस्तके माळ्यावर अडगळीत पडलेली होती, ती त्यांना मिळायची. ती ते वाचायचे. जसे आपण वाचनाला सुरुवात करतो तसे हळूहळू आपले वाचनही विकसित होऊ लागते. मग अगदी सुरुवातीला कथा, कादंबऱ्यापासून आरंभ केला तरी सुद्धा पुढे जाऊन आपल्याला नेमकी आवड मिळत जाते. मग तो तो माणूस आवडायला लागतो, त्याने काय लिहिले आहे ते-ते आवडायला लागते आणि यातूनच आपले आदर्श ठरत जातात.

‘काळ’ क्रांतीप्रवण जीवनाच्या स्फूर्तीचे गुरु!  

एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन तिथे मिळालेल्या पहिल्या पारितोषिकानुसार त्यांना शिवराव महादेव परांजपे यांचे ‘काळ’ हे वर्तमानपत्र वर्षभर फुकट पाठवण्यात येणार होते. ‘काळ’ मधील परांजपे यांचे तेजस्वी व वक्रोक्तीयुक्त लिखाण वाचायला मिळाल्यानंतर वीर सावरकर यांच्या मूळच्या क्रांतिकारक प्रवृत्तीला अधिकच धार चढली. ‘काळ’मधील लेखनाचा आपल्यावर किती परिणाम झाला हे सांगताना वीर सावरकर म्हणतात की, माझ्या मतावर नसला, तरी माझ्या ज्ञानावर, भाषेवर, संस्कृती आणि उत्साहावर ‘काळ’च्या अखंड परिशीलनाचा मोठा परिणाम झाला. इतका की, जर माझ्या क्रांतीप्रवण जीवनाच्या स्फूर्तीचे गुरुपद कुणाला तरी द्यायचे असेल, तर ते मी ‘काळ’ वर्तमानपत्रालाच देऊ शकेन. पण तेही केवळ क्रांतिकारक स्फूर्तीचे, कृतीचे नव्हे. कारण क्रांतिकारक संघटनेत मलाच माझे पुढारी व्हावे लागले.

kaal

सावरकरांवर मॅझिनीचा विलक्षण प्रभाव

वीर सावरकर यांच्यावर इटलीचा स्वातंत्र्य योद्धा  मॅझिनीचा विलक्षण प्रभाव पडलेला दिसतो. लंडनला गेल्यावर इंडिया हाऊसचे मुखर्जी हे व्यवस्थापक होते, त्यांच्याकडून त्यांनी मॅझिनीचे आत्मवृत्त आणि समग्र ग्रंथसंग्रह यांचे सहाही भाग मिळवले, त्यांचे वाचन केले आणि त्याच्यानंतर त्यांनी मॅझिनीवर अडीचशे पानांचा ग्रंथ लिहून पूर्ण केला. त्या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना ही २६ पानांची होती. त्या काळात असंख्य तरुणांनी ही प्रस्तावनाच तोंडपाठ केली होती. एखाद्या पुस्तकाची प्रस्तावना संपूर्ण पाठ करणे ही खरेतर अतिशयोक्ती वाटू शकेल. पण तसे नसून खरोखरीच अनेक तरुणांनी ती तोंडपाठ केली होती. हे पुस्तक बाबाराव सावरकर यांनी १९०७ साली प्रसिद्ध केले होते. त्याची लोकप्रियता इतकी होती की, त्यांची २ हजार प्रतींची पहिली आवृत्ती केवळ महिनाभरातच संपली होती. इतका या पुस्तकाचा बोलबाला झाला होता. ‘केसरी’, ‘काळ’, ‘विहारी’ आदी अनेक त्यावेळच्या वृत्तपत्रांनी त्यावर अग्रलेख लिहिले होते आणि वीर सावरकरांच्या मॅझिनीचे सहर्ष स्वागत केले. वीर सावरकर यांनी त्यांचा पहिलाच ग्रंथ त्यांचे पूर्वीचे असलेले आदर्श म्हणजे ‘केसरी’कार लोकमान्य टिळक आणि ‘काळ’कर्ते परांजपे यांनाच अर्पण केला. वीर सावरकरांचे मॅझिनीबद्दलचे प्रेम असे होते की, त्यांनी त्यांचा ‘भगवान मॅझिनी’ असा उल्लेख केला. इतकेच नव्हे तर ते असेही म्हणतात की, इटलीमध्ये जन्मलेल्या रामदासाला मॅझिनी म्हणतात आणि भारतात जन्मलेल्या मॅझिनीला रामदास म्हणतात. परमेश्वराने  प्रत्येक देशाकरता असा एक मॅझिनी ठेवला असेल, तर कुणालाच इटलीचा हेवा करण्याचे कारण नाही.

mazini

(हेही वाचा धर्मांतर केल्यास १० वर्षांची शिक्षा, हिमाचलमध्ये कायदा मंजूर)

छत्रपती शिवाजी महाराज प्रमुख आदर्श!

वीर सावरकर हे सर्व वाचत असताना, बघत असताना त्यांच्या समोरचे आदर्श पुरुष म्हणून जर बघायला गेले, तर ते छत्रपती शिवाजी महाराज हेच असावेत, असे नक्की वाटते. त्याला कारण, महाविद्यालयात गेल्यावर वीर सावरकर यांनी आपल्या मित्रमेळ्यामध्ये अर्थात मित्रमंडळींच्या क्लबमध्ये शिवरायांची मोठी तस्वीर लावली, तसेच दर शुक्रवारी आरती सुरु केली. त्याकरता त्यांनी शिवरायांवरील आरती स्वतः रचली. वीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सूक्ष्म अभ्यास तत्कालीन काळात जी जी कागदपत्रे मिळाली, त्याच्या आधारे केला.

shivaji

लोकमान्यांचे अत्यंत कृतज्ञ, निष्ठावंत अनुयायी

लोकमान्य टिळक यांच्या ‘केसरी’चाही वीर सावरकर यांच्या राजकीय विचारांच्या जडणघडणीत मोठा सहभाग होता. यासंदर्भात स्वतः वीर सावरकर यांनीच म्हटले की, क्रांतिकारक धोरणांची गोष्ट वगळली असता ‘काळ’ वर्तमानपत्राइतकीच नव्हे तर त्याहीपेक्षा अधिक पटीने माझी केसरीवर अबाल्य भक्ती होती. ‘काळ’ प्रमाणेच केसरीच्याही लेखांची मी पारायणे करत असे. लोकमान्यांच्या निष्ठावंत अनुयायांपेक्षा मी अधिक कृतज्ञ व निष्ठावंत होतो आणि राहिलो याचे हेच निरुत्तर प्रत्यंतर आहे की, मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी लोकमान्यांचे सर्व राजकारण आणि उपदेश आचरण्याची पराकाष्ठा करून त्यांच्या कार्यक्षेत्राच्या पुढच्या प्रत्यक्ष रणक्षेत्रावर उतरण्याची हाव धरली. लोकमान्य हे खड्गाची मूठ होते, तर आम्ही क्रांतिकारक त्याचे पाते होतो. खड्गाची मूठ ही जरी पाते होऊ शकत नाही, तरी पाते हे मुठीच्याच आधारे रणकंदनी लवलवते. पाते हे मुठीच्याच मनोगताचे पारणे फेडीत असते.

tilak 1

लेखक – डॉ. सच्चिदानंद शेवडे, ज्येष्ठ साहित्यिक आणि राष्ट्रीय व्याख्यान-प्रवचनकार.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.