जागतिक दर्जाचे पेपर उत्पादक असलेल्या बल्लारपूर पेपर मिलच्या कळमना येथील लाकूड डेपोला रविवारी दुपारी ३ वाजता भीषण आग लागली असून, रात्री उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आली नव्हती. ती विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न जारी आहेत. या आगीत लाकूड डेपो, जवळच असलेला पेट्रोल पंप जळून खाक झाला असून, यात करोडो रुपयांची वित्तहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. या आगीत सुदैवाने प्राणहानी झाली नाही.
अग्नीशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल
कळमना गाव आजूबाजूला जंगलाने वेढलेले असून, दुपारी अचानक पेपर मिलच्या लाकूड डेपोमध्ये आग लागली. बल्लारपूर- आलापल्ली रस्त्यावरील कळमना गावाच्या उजव्या बाजूला हा डेपो आहे. जिथे पेपर मिलच्या बांबूसह निलगिरीच्या लाकडाचा साठा आहे. त्यातच ही आग लागली आहे, तर रस्त्याच्या दुतर्फा बांबू ठेवण्यात आला आहे. आग तिथपर्यंत पोहोचली. डेपोला आग लागल्याची माहिती जिल्हाभरात पसरताच गडचांदूर येथील अल्ट्राटेक, अंबुजा, राजुरा नगरपालिका, चंद्रपूर महानगरपालिका यासह जिल्हाभरातील १२ गाड्यांचे अग्निशमन दलाचे पथक पोहोचले. मात्र आग इतकी भीषण आहे की, ती आटोक्यात आणणे अशक्य आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे आलापल्ली चंद्रपूर महामार्गावरून वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. भीषण आगीची माहिती मिळताच तहसीलदार संजय रैंचवार, ठाणेदार उमेश पाटील, कोठारीचे ठाणेदार तुषार चौहान हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले.
( हेही वाचा: गुन्हेगाराला ‘गुंडा’ का बोलतात माहितीय का? वाचा ‘गुंडा’ या शब्दाच्या उत्पत्तीची भन्नाट जन्मकथा )
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
आगीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची ये-जा थांबवली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या विद्युत तारा जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या गावात अंधार पसरणार आहे. आग नेमकी कशी लागली हे स्पष्ट होऊ शकले नाही.
Join Our WhatsApp Community