अजून एक अग्नितांडव! विरार येथील रुग्णालयाला आग… १३ जणांचा मृत्यू

133

नाशिक येथील कोविड रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे २२ जण दगावल्याची घटना ताजी असतानाच, आता पालघर जिल्ह्यातील विरार येथे एका रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची, अशी माहिती मिळत आहे.

कुठे लागली आग?

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयात कोविड रुग्ण भरती आहेत. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात(आयसीयू) २३ एप्रिल रोजी पहाटे ३.१५च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात ९० जण उपचार घेत होते. तर आयसीयू विभागात उपचार घेणा-या १७ रुग्णांपैकी १३ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे, तर ६ रुग्ण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान विरार अग्निशमन दलाने तातडीने धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू

शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर येत नाही. आग विझवण्यात आली असून कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. तसेच येथील रुग्णांना इतर रुग्णालयात नेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या खासगी रुग्णालयात अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली मदत

विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे.

हितेंद्र ठाकूर यांची प्रतिक्रिया

वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची चौकशी केली आहे. मी इथे रुग्णांना मदत करण्यासाठी आलो आहे. रुग्णालयाचा दुसरा मजला जळून खाक झाला आहे. अशी माहिती वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांची माहिती

ही घटना अत्यंत दुःखद आहे, या घटनेची चौकशी करण्यात येईल, दोषींवर कारवाई करण्यात येईल, सध्या जे रुग्ण जीवित आहेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, त्यामुळे त्यातील काही जणांना दहिसरच्या कोविड सेंटरला हलवण्यात आले आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थेट पोलिस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले, त्याप्रमाणे प्राथमिक अहवाल देण्यात येणार असल्याचे समजत आहे.

पंतप्रधानांनी जाहीर केली मदत

या घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली असून, या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये तर गंभीर जखमींना ५द हजाप रुपयांची मदत केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख

या घटनेची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही दखल घेतली असून, या घटनेत मृत्यूमुखी झालेल्यांच्या प्रती त्यांनी दुःख व्यक्त केले आहे. आपण मृतांच्या दुःखात लहभागी आहोत, जखमी रुग्णांना लवकरात लवकर बरे वाटावे हीच ईश्वराचरणी प्रार्थना, अशा शब्दांत अमित शहा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.