भिवंडी तालुक्यात सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत असतात. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील दापोडा परिसरात एका केमिकल गोदामाला भीषण आग लागली आहे. ही भीषण आग बुधवारी सकाळच्या दरम्यान लागली असून इंडियन कॉर्पोरेशन गोदामात भीषण अग्नितांडव पाहायले मिळाले.
3 गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी
इंडियन कॉर्पोरेशन गोदामातील या भीषण आगीत संकुलातील 3 गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच भिवंडी आणि ठाणे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळे दापोडा परिसरातील या गोदामातून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले असून आजू-बाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
(हेही वाचा – ‘बेस्ट’च्या कंत्राटी चालकांचा संप, १६३ बस डेपोतच; कंत्राटदाराला दंड )
धुरामुळे जवानांना मदतकार्यात अडथळा
भिवंडी तालुक्यात दापोडा येथे हे इंडियन कॉर्पोरेशनचे संकुल आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास या संकुलातील 3 गोदामात अचानक आग लागल्याचे लक्षात आले. या गोदामात थिनर, पेंट याचा साठा असल्याने आग आणखीच भडकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या भीषण आगीमुळे दापोडा परिसरातील या गोदामातून मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना मदतकार्यात अडथळा येत आहे. मात्र तरी देखील ही भीषण आग विझवण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.