दादर पश्चिम येथील यश प्लाझा इमारतीत सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आग लागण्याची दुघर्टना घडली. मात्र, या आगीच्या दुघर्टनेनंतर फेरीवाल्यांनी रस्ते अडवल्याने गर्दीतून मार्ग काढत अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यास विलंब झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ज्या डिसिल्व्हा रोडवरील इमारतीत आग लागली होती, त्या मार्गावर देवीचा मंडप असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना कबुतर खाना मार्गे जावळे रोडकरून स्टेशन परिसरात यावे लागले. त्यामुळे आधी रस्त्यांवर उभारलेला देवीचा मंडप आणि त्यांनतर फेरीवाले व लोकांच्या गर्दीतून अरुंद रस्त्यातून मार्ग काढत अग्निशमन दलाची गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या दुघर्टनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी विलंबाने पोहोचलेल्या बंबांच्या गाड्यांमुळे प्रशासनालाही विचार करण्याची वेळ आली आहे.
( हेही वाचा : ‘फार्मासिस्ट्स सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा’)
दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानकाच्या समोरील डिसिल्व्हा रोडवरील शगुन हॉटेलच्या मागे असलेल्या यश प्लाझा या तळ अधिक तीन मजल्यांच्या कमर्शियल इमारतीत आग लागण्याची घटना सोमवार रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या इमारतीच्या तळ मजल्यापासून आगीचे धुर येत असल्याने तात्काळ अग्निशमन दलाला वर्दी देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाची वाहने न.चि. केळकर मार्गावरून घटनास्थळाच्या जवळ पोहोचल्या. परंतु डिसिल्व्हा रोडवर येथील मंडईच्यावतीने बसवण्यात येणाऱ्या देवीचा मंडप असल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग बंद होता. त्यामुळे अग्निशमन दलाच्या बंबाच्या गाड्या जावळे मागावरून केशव सूत उड्डाण पुलाखालून डिसिल्व्हा रोडवर पोहोचल्या. परंतु तोपर्यंत धुराचे रुपांतर आगीच्या रोळात झाले आणि आग अधिक भडकू लागली. इमारतीत ग्लास फसाडची असल्याने अग्निमशन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्याच्या कामाला सुरुवात केली आणि रात्री सव्वा अकरा वाजता आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांसह अधिकाऱ्यांना यश आले.
दादर रेल्वे स्थानकाच्या समोरच ही आग असल्याने तसेच दाटीवाटीचा परिसरात गर्दीच्या ठिकाणी ही इमारत असल्याने मुंबई अग्निशमन दलाच्या ४ फायर इंजिन, १ एएलपी, ४ जेटी, एक बीए व्हॅन आदींचा ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे रात्री ९ नंतर फेरीवाले आपली आवराआवरा करत असले तरी नवरात्रौत्सव असल्याने फेरीवाले रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करत असतात. त्यामुळे रस्त्यांवर फेरीवाल्यांची गर्दी असल्याने अग्निशमन दलाच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी याच परिसरातील दरबार हॉटेलमध्ये रात्रीच्यावेळी आग लागण्याचा प्रकार घडला होता. यातही वाहनांना घटनास्थळी पाहोचण्यास फेरीवाल्यांमुळे अडचण झाली होती. त्यामुळे दादर सारख्या भागांमध्ये अशाप्रकारची आगीची घटना दिवसा घडल्यास मोठी जिवितहानीसह मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे दादर सारख्या भागांमध्ये अग्निशमन दलाची वाहने सुरळीतपणे येवू शकतील अशाप्रकारची व्यवस्था राखण्यासाठी फेरीवाले रस्त्यांवर बसवणार नाही याची काळजी आता महापालिकेला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या घटनेवरून महापालिकेने रस्त्यांवर फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव करावा अशाप्रकारची प्रतिक्रियाच स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
Join Our WhatsApp Community