राज्यभरातील ७० मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या इमारतींमध्ये ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ऊर्जा विभागाने तसा निर्णय घेतला असून, महानगरपालिका आणि अग्निशमन विभागाला त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली आहे.
( हेही वाचा : शिवसेना-राष्ट्रवादीचे निकालाआधीच ठरले होते…; देवेंद्र फडणवीस यांची टीका )
टोलेजंग इमारतींमध्ये आगीची घटना घडल्यास आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हा सर्वात सुरक्षित आणि जलद मार्ग आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये उंच इमारती उभारणाऱ्या विकासकांनी अ-प्रमाणित किंवा कमी दर्जांची फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट्स स्थापित केल्याचे निदर्शनास आले आहे. किंबहुना अनेकांचा कल त्याकडे आहे. मात्र, आग लागल्यास ही यंत्रणा योग्य सुरक्षा प्रदान करू शकत नाही. याउलट, फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट्स हा अधिक सुरक्षित आणि खात्रीशीर पर्याय आहे. अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना उच्च मजल्यापर्यंत जलद पोहोचण्यासाठी आणि पाळीव प्राण्यांसह सर्व वयोगटातील नागरिकांना तीन मिनिटांपेक्षा कमी वेळेत (३० मिनिटांत जवळपास १०० लोकांना) बाहेर काढण्यास ही यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी जीवित आणि वित्तहानी टाळता येईल.
‘महाराष्ट्र लिफ्ट कायदा’ लवकरच
ऊर्जा विभागाच्या परिपत्रकानुसार, यापुढे राज्यात फायर इव्हॅक्युएशन लिफ्टच्या उभारणीसाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. नवीन मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी नव्या फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट इंस्टॉलेशन्ससाठी तत्काळ लागू होईल. तर विद्यमान फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट इंस्टॉलेशन्सना पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल. दरम्यान, राज्य सरकार ‘महाराष्ट्र लिफ्ट कायदा’ तयार करीत असून, त्यात अशा पद्धतीच्या लिफ्टसंदर्भात मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केली जातील.
लिफ्ट नेमकी कोणत्या बाजूला असावी, त्याची वैशिष्ट्ये काय असावी यासंदर्भात सर्व बाबी त्यात नमूद असतील, अशी माहिती इलेक्ट्रीकल अधिकारी दिनेश खोंडे यांनी दिली. हा कायदा या महिन्याच्या अखेरीस पर्यंत अमलात येणार आहे. यापूर्वी अशा पद्धतीच्या ज्या काही लिफ्ट बसवण्यात आल्या होत्या, त्या चुकीच्या पद्धतीने बसवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये नागरिकांच्या जीविताला धोका होता, त्यामुळे त्या थांबवल्या होत्या. मात्र यापुढे ७० मीटरपेक्षा अधिक उंच इमारतींमध्ये तत्काळा ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ बसविल्या जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.