दिवाळी होती म्हणून बसमध्ये ड्रायव्हर-क्लिनर दिवे लावून झोपले अन्…

145

रांचीमधील कांटाटोली येथील खडगडा बस स्टँडवर एक भीषण अपघात झाला. बसस्थानकात उभ्या असलेल्या बसला आग लागल्याने चालक आणि सहचालकाचा मृत्यू झाला. मदन आणि इब्राहिम अशी मृतांची नावे आहेत. मदन हा बसचा चालक होता तर इब्राहिम हा बसमध्ये क्लिनर म्हणून काम करायचा. अपघात झाला तेव्हा दोघेही बसमध्ये झोपले होते, असे सांगण्यात येत आहे.

बसमध्ये दिवा लावला आणि ते झोपले

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिवाळी होती म्हणून मदन आणि इब्राहिम बसमध्ये दिवा लावून झोपले होते. दिव्यामुळे बसला आग लागल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इब्राहिम आणि मदन गाढ झोपेत असल्याने त्यांना आगीची माहिती वेळेवर मिळाली नाही. त्यांना काही समजण्याच्या आत बसने पेट घेतला होता. आग इतकी भीषण होती की त्यांना बाहेर पडणं शक्य झाले नाही. यामुळे दोघांचाही जळून मृत्यू झाला आणि ही दिवाळी त्या दोघांची शेवटची दिवाळी ठरली.

राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून अपघातात प्राण गमावलेल्या मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर लिहिले आहे की, रांची येथील खडगडा बसस्थानकात बसला लागलेल्या आगीत चालक आणि क्लिनर यांचा मृत्यू अत्यंत वेदनादायी आहे.

(हेही वाचा – मालगाडी अपघात, मुंबई-पुणे-नागपूर रेल्वे मार्गावर एका बाजूने वाहतूक सुरू)

दिवाळीच्या दिवशी घडलेल्या या वेदनादायक अपघाताने बसस्थानकात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना हादरवून सोडले आहे. या प्रकरणाची पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून त्या दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.