इमारतीची अग्निसुरक्षा ही संयुक्त जबाबदारी, महापालिकेने पुन्हा दिला कारवाईचा इशारा

84

अग्निसुरक्षा ही संयुक्त जबाबदारी असूनही अनेक इमारतीमध्ये अंतर्गत सजावटीसाठी भरमसाठ प्रमाणात ज्वलनशील तथा सहजगत्या जळणा-या पदार्थांचा अनावश्यक वापर करण्यात येतो. तसेच सजावटीसाठी मूळ अंतर्गत संरचनेत तसेच अग्निसुरक्षा यंत्रणेत व विद्युत संरचनेत फेरफार करण्यात येतात. त्यामुळे आगीचा धोका वाढतो. त्यामुळे महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियमांमधील तरतुदींचे पालन करणे हे संबंधीत मालक तथा भोगवटादार यांच्यासाठी आवश्यक आहे. अन्यथा, त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येत आहे.

वन अविघ्न पार्क या गगनचुंबी इमारतीमध्ये दिनांक २२ ऑक्टोबर २०२१ रोजी लागलेल्या आगीची दुर्घटना व त्यामुळे झालेली जीवितहानी व वित्तहानीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व संबंधितांना आवाहन करण्यात येते की, अग्निविषयक दुर्घटना टाळण्याकरीता, महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ च्या कलम ३ (१) नुसार आपल्या इमारतीमध्ये किंवा इमारतीच्या भागामध्ये आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनांतील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे दायित्व संबंधीत मालक / भोगवटादार यांचे आहे. ही बाब पुन्हा एकदा निदर्शनास आणून देण्यात येत आहे.

अन्यथा, त्यांच्यावर कारवाई होणार

मुंबई महानगरातील सर्व इमारतींमधील विशेषतः उत्तुंग इमारतींमधील अग्निशमन यंत्रणा आणि उपकरणे तसेच आगीची धोक्याची सूचना देणारी उपकरणे योग्यरित्या सुरु असल्याची खातरजमा करणे त्याचप्रमाणे महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियमांमधील तरतुदींचे पालन करणे हे संबंधीत मालक / भोगवटादार यांच्यासाठी आवश्यक आहे. अन्यथा, त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पालिकेने केलं जाहीर आवाहन

उत्तुंग इमारतीमध्ये राहणारे रहिवासी यांनी इमारतीमध्ये बसविलेली आगीची धोक्याची सूचना देणारी व आग विझविण्याची सर्व उपकरणे व्यवस्थितरित्या सुरू असल्याबाबतची, तसेच त्यांच्या सुयोग्य हाताळण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असल्याबाबतची वेळोवेळी खातरजमा करावी. त्याचप्रमाणे इमारतीत बसविलेली राईझर व स्प्रिंकलर सिस्टीम कार्यान्वित आहे किंवा नाही, याबाबत नियमित केल्या जाणाऱ्या अग्निसुरक्षा कवायती करताना कटाक्षाने लक्ष द्यावे. अंतर्गत सजावटीसाठी वापरण्यात येणाऱया अनेक प्रकारच्या साहित्यात ज्वलनशील पदार्थांचा अनावश्यक वापर टाळण्यात यावा. तसेच त्यासाठी अग्निरोधक रसायनांची / रंगाची प्रक्रिया त्यावर करावी. मूळ अंतर्गत संरचनेत, अग्निसुरक्षा यंत्रणेत व विद्युत संरचनेत फेरफार करु नये. अंतर्गत वास्तू सजावटकारांनी व वास्तू विशारदांनी देखील या बाबींकडे विशेष लक्ष देणे येथे आवश्यक आहे. अग्नि सुरक्षेविषयक साक्षरता वाढीस लागावी तसेच जनजागृतीसाठी जनहितार्थ महानगरपालिका प्रशासनाकडून हे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

(हेही वाचा – आता चालता-चालता न्याहाळता येणार महालक्ष्मी रेसकोर्स!)

इमारत किंवा इमारतीच्या भागामधील आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक योजनेमधील प्रस्थापित अग्निशमन यंत्रणा उत्तम व कार्यक्षम स्थितीत असल्याबाबत परवाना (लायसन्स) प्राप्त अभिकारणाकडून कलम ३ (३) व नियम ४ (२) नुसार सहामाही प्रमाणपत्र वर्षातून दोनदा “नमुना ब” प्रमाणे जानेवारी व जुलै महिन्यात प्राप्त करून घेणे हे बंधनकारक आहे. सदर “नमुना ब” सहामाही प्रमाणपत्र इमारतीचे मालक / भोगवटादार यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावर (https://portal.mcgm.gov.in) अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. “नमुना ब” सहामाही प्रमाणपत्र हे मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी पुढीलप्रमाणे मार्गाचा अवलंब करण्यात यावा. संकेतस्थळाच्या मुख पृष्ठावर ‘व्यवसायाकरिता’ या विभागात, परवानग्यांकरिता अर्ज या शीर्षकाखाली अग्निशमन दस्तऐवज या उप शीर्षकामध्ये अपलोड हा पर्याय उपलब्ध आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.