बैलगाडा शर्यतीच्या नाही तर निवडणुकीच्या वादातून अंधाधुंद गोळीबार

103

बैलगाडाच्या शर्यतीच्या वादातून नाही तर निवडणूक लढवायची नाही या वादातून अंबरनाथ येथे रविवारी पंढरीनाथ फडके गटाकडून राहुल पाटील यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंबरनाथ मधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुरुनाथ फडके, पंढरीनाथ फडके या पितापुत्रासह ४० जणांविरोधात गुन्हा करण्यात आला असल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांनी दिली आहे.

(हेही वाचा – “योग्य पद्धतीने काम करायचं नसेल तर…”, राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिली तंबी)

काय घडला प्रकार

या गोळीबारात पिस्तुल, रिव्हॉल्वर, डबल बोर बंदुकीचा सर्रासरित्या वापर करण्यात आलेला आहे. अंबरनाथ एमआयडीसी येथील सुदामा हॉटेलजवळ रविवारी दुपारी दोन गटात झालेल्या तुफान राड्यामध्ये एका गटाकडून दुसऱ्या गटावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या अंधाधुंद गोळीबाराची व्हिडीओ देखील समाज माध्यमावर व्हायरल झाली. कल्याण पूर्व अडवली गावातील बांधकाम व्यवसायिक राहुल पाटील आणि रायगड जिल्ह्यातील पंढरीनाथ फडके गट रविवारी दुपारी अंबरनाथ एमआयडीसी सुदामा हॉटेल या ठिकाणी बैलगाडा शर्यतीच्या बैठकीसाठी एकत्र आले होते.

यादरम्यान पंढरीनाथ फडके याने राहुल पाटील याला तू कुणाल पाटीलच्या विरोधात आगामी निवडणुकीत उभे राहायचे नाही अशी धमकी दिली, व यावरून दोन्ही गटात शाब्दिक वादावादी होऊन पंढरीनाथ फडके गटाने पिस्तुल, रिव्हॉल्वर आणि डबल बोरच्या बंदुकीतून राहुल पाटील यांच्या वाहनांच्या ताफ्यावर गोळीबार करून पळ काढला, सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही.

अंबरनाथमधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात राहुल पाटील यांच्या तक्रारीवरून गुरुनाथ फडके, पंढरीनाथ फडके या पितापुत्रासह सुमारे ४० जणांविरोधात शस्त्र अधिनियम कायदा, हत्येचा प्रयत्न, कट रचणे, धमकी देणे, दंगल माजवणे, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. ज्या गटाने गोळीबार केला त्यांच्याकडे असलेली शस्त्रांचा परवाना आहे का किंवा हे शस्त्रे बेकायदेशीर आहे, याबाबत सविस्तर माहिती घेण्यात येत असून लवकरच आरोपीना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली येथे अनेक गट तयार झालेले असून त्यापैकी कल्याण पूर्व अडवली या ठिकाणी कुणाल पाटील आणि राहुल पाटील हे गट तयार झाले आहे. आगामी निवडणुकीसाठी हे दोघे एकाच वॉर्डातून निवडणूक लढवणार आहेत. दोन्ही गट स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात राहुल पाटील हे बाळासाहेबांची शिवसेना गटातून निवडणूक लढवणार असल्याचे कळत आहे. हे दोन्ही गट साम दाम दंड या तिघांचा वापर आपल्या विभागात करीत आहे, असेच सुरू राहीले तर येत्या काळात कल्याण डोंबिवलीत मोठे राडे होण्याची तसेच मोठया प्रमाणात रक्तपात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.