कल्याणमध्ये लेप्टोचा पहिला बळी तर मुंबईत रुग्णांची शंभरी

जुलै महिन्यात पावसाचा कहर संपूर्ण राज्यभरात दिसून आल्यानंतर आता लेप्टोस्चारायरोसिस हा आजार पावसाच्या साचलेल्या पाण्यात चाललेल्या लोकांमध्ये वाढू लागल्याने आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणाअंती दिसून आले. कल्याणमध्ये राज्यातील पहिल्या लेप्टोच्या रुग्णाच्या बळीची नोंद झाली. मुंबईत राज्यातील इतर भागांच्या तुलनेट ९८ टक्क्यांहून जास्त लेप्टोचे रुग्ण आढळून आल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली.

(हेही वाचा – CWG 2022: भारताची पदकसंख्या १४ वर, लवप्रीत सिंगने वेटलिफ्टिंगमध्ये जिंकले कांस्य!)

कल्याणमध्ये लेप्टोची बाधा झालेल्या पहिल्याच रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून दिली गेली. मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. राज्यात कोकण पट्ट्यात किनारपट्टी भागांत लेप्टोचे रुग्ण प्रामुख्याने आढळतात. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण आढळतात. १ ऑगस्टपर्यंत मुंबईत राज्यभरातील इतर भागांच्या तुलनेत लेप्टोच्या रुग्णांची सर्वाधिक वाढ झाल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली. १ ऑगस्टपर्यंत मुंबईत लेप्टोच्या रुग्णांची शंभरी गाठली गेली आहे. मुंबईत सर्वात जास्त रुग्ण एम ईस्ट वॉर्ड म्हणजेच मानखुर्द, गोवंडी आणि बैंगनवाडी या भागांत दिसून येत आहेत .

राज्यातील लेप्टोस्पायरोसिस रुग्णांची जिल्हानिहाय संख्या – (१ ऑगस्टपर्यंत)

बृहन्मुंबई – १००
ठाणे ग्रामीण- ७
ठाणे शहर – १
कल्याण – १

आरोग्य कर्मचारी घरात येणार

लेप्टोचा प्रसार झालेल्या चारही जिल्ह्यांमधील आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी आता घरोघरी भेट देणार आहेत. ज्या घरात तापाचे रुग्ण आहेत, त्यांची माहिती घेतली जाणार आहे. तसेच तब्येतीबाबत आढावा घेण्याची सूचना आरोग्य विभागाने केली आहे.

सर्व आरोग्य केंद्रामध्ये लेप्टोची तपासणी

संशयित लेप्टो रुग्णाचे निदान विनाविलंब होऊन उपचार तातडीने मिळावेत, या हेतूखातर लेप्टो प्रभावित जिल्ह्यांमध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तसेच ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रॅपिड डायग्नोस्टीक कीटची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालये व निवडक उपजिल्हा रुग्णालयात एलायझा चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच जिल्हा रुग्णालयांत डॉक्सीसायक्लीन हे कॅप्सूलही उपलब्ध करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिली.

लेप्टोस्पायरोसिसविषयी 

० लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा या रोगजंतुमुळे होणारा आजार आहे. हा पाण्याशी संबंधित आजार आहे. कोकण विभागात हा आजार प्रामुख्याने आढळतो. रोगबाधित उंदीर, डुक्कर, गाई, म्हशी, कुत्री यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. या प्राण्यांच्या लघवीने दूषित झालेले पाणी, माती, भाज्या यांचा माणसाशी संपर्क आल्याल लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो)ची बाधा होते.
० पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा सुगीच्या काळात दूषित झालेला परिसर या आजाराचे प्रमुख स्त्रोत आहे.
० हा प्रामुख्याने जनावरात आढळणारा संसर्गजन्य आजार आहे.
० संसर्ग झालेल्या जनावराच्या मूत्र, रक्त किंवा मांसाशी संपर्क आल्यास या आजाराचा प्रसार होतो. शरीरावरील जखम किंवा नाक, तोंड, डोळे यांच्या अभित्वचेमार्गे या रोगाचे जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात.
० हा आजार ७ ते १२ दिवसांच्या काळात बळकावतो

लक्षणे 

० तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, थंडी वाडणे, डोळे सुजणे
० मूत्रपिंडाचे व यकृताचे काम बंद पडून मृत्यूही ओढावतो. ब-याचदा रुग्णांची लक्षणे किरकोळ व समजून न येणारी असतात

तपासणी

रॅपीड डायग्नोस्टीक कीट किंवा एलायझा चाचणी लेप्टोच्या निदानासाठी केली जाते

उपचार

पेनिसिलिन, डॉक्सीसायक्लीन, टेट्रासायक्लिन ही प्रतिजैविके या आजारासाठी प्रभावी ठरतात.

प्रतिबंधात्मक उपाय

० दूषित पाणी, माती किंवा भाज्यांशी मानवी संपर्क टाळणे
० दूषित पाण्याशी संपर्क अपरिहार्य असल्यास रबर बूट, हात मोजे वापरावेत. कोकणात भातशेतीत काम करणा-या माणसांसाठी हे फार महत्त्वाचे आहे
० प्राण्यांच्या लघवीमुळे पाणीसाठे दूषित होऊ नयेत, याची काळजी घेणे आवश्यक आहे
० परिसरातील उंदीरांचे नियंत्रणही महत्त्वाचे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here